घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली. यामुळे 14.2 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 18 टक्केंनी कपात झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाईने त्रस्त झालेल्य़ा देशभरातील नाकरिकांना या दरकपातीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर येत्या काही महिन्यांत महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका आणि 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकारचा निर्णय असल्याचेही जाणकारांनी म्हटले आहे.
दिल्लीमध्ये यासंबंधीची घोषणा करताना अनुराग ठाकूर म्हणाले की “मंत्रिमंडळाने सिलिंडरवर अतिरिक्त 200 रूपये अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे प्रति सिलिंडर २०० रुपयांची कपात जाहीर केली आहे. PMUY अंतर्गत 75 लाख नवीन गॅस कनेक्शन विनामूल्य स्थापित केले जाणार असून ओणम आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहेत.”
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात 7,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या तरतूदीमध्ये शासनाच्या तिजोरीवर 4,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दिल्लीत, 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,103 रुपयांवरून 903 रुपयांवर येईल. तर मुंबईत ती 1,102.50 रुपयांवरून बुधवारपासून 902. 50 रुपये होईल.