सुवर्ण विधानसौध येथे भेट देऊन केली पाहणी : अधिकाऱ्यांना केल्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार दि. 19 पासून सुरुवात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू असून कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी सुवर्णसौधला भेट देऊन या तयारीबाबतचा आढावा घेतला आहे.
सुवर्णसौधमधील आसन व्यवस्था, तेथील सर्व फर्निचर, साऊंडसिस्टीम, इंटरनेट सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता याबाबतची माहिती घेतली. या सर्व विभागाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. अधिवेशनापूर्वी सर्व व्यवस्था ठेवण्याची त्यांनी सूचना केली.
ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे बीएसएनएलची पुरेशी इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सदेखील होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
सुवर्णसौधमधील शौचालयांची स्वच्छता, अग्निशमन यंत्रणेची देखभाल याबाबत देखील त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिवेशनासाठी विविध समित्या स्थापन केल्याची माहिती दिली. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या वाहतुकीची सोय तसेच जेवणाची व्यवस्था करण्याबाबत सर्व तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सुरक्षा पुरविण्याबाबत माहिती यावेळी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अरुण पाटील यांनी विविध प्रकारची दुरुस्ती तसेच इतर कामे पूर्ण झाल्याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.