शॅडो कौन्सिल फॉर मडगावकडून मागणी
मडगाव : यंदा मडगावातील कार्निव्हल व शिमगोत्सवाच्या मिरवणुका या पारंपरिक मार्गाने म्हणजे होली स्पिरीट चर्च सर्कल ते पालिका चौकापर्यंत काढण्यात आल्या. वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बसविण्यात आलेले ‘ट्रफिक बॅरिअर्स’ या मिरवणुकांसाठी काढण्यात आले होते परंतु कार्यक्रम पार पडल्यानंतर अद्यापही ते बसविण्यात आलेले नसून ते पूर्ववत बसविण्याची मागणी शॅडो कौन्सिल फॉर मडगावकडून करण्यात आली आहे. शहरात 19 फेब्रुवारी रोजी कार्निव्हलची मिरवणूक तर 18 मार्चला शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुका याआधी फातोर्डा येथे एसजीपीडीए मैदानापासून सुरू होत होत्या. यावर्षी मडगाव पालिकेकडून पुन्हा पारंपरिक मार्गावरूनच कार्निव्हल व शिमगोत्सवाच्या मिरवणुका काढण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळी पालिकेने होली स्पिरीट चर्चनजीकचे व पुढील ट्रफिक बॅरिअर्स काढले होते. होली स्पिरीट चर्चजवळील ट्रफिक बॅरिअर्स बाजूच्या गटारात पडलेले दिसत आहेत तर पालिकेजवळील बॅरिअर्स दिसत नाहीत, याकडे शॅडो कौन्सिलने लक्ष वेधले आहे. शिमगोत्सव मिरवणुकीला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही ते बॅरिअर्स पुन्हा बसविण्यात आलेले नाहीत. ते जानेवारी महिन्यातच बसविले होते. होली स्पिरीट चर्चनजीक अनेक वाहनचालक गाडय़ा वळविण्याचा प्रयत्न करतात आणि वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी हे बॅरिअर्स बसविण्यात आले होते. वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी हे बॅरिअर्स पूर्ववत बसवावेत, अशी मागणी शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.