कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांचे विधान, सौम्यतेचे संकेत
ओटावा
जागतिक राजकारणाचा आणि आव्हानांचा विचार करता भारताशी कॅनडाचे संबंध असणे आवश्यक आणि महत्वाचेच आहे. मात्र, आम्हाला आमच्या देशातील कायद्यांचाही मान राखावा लागणार आहे, असे प्रतिपादन कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेअर यांनी येथे एका कार्यक्रमात केले. यावरुन हरदीपसिंग निज्जर प्रकरणी कॅनडा आपल्या भूमिकेत सौम्यता आणत असल्याचे संकेत मिळत आहेत.
निज्जर याची जूनमध्ये कॅनडात हत्या करण्यात आली होती. या हत्येत भारत सरकारच्या हस्तकांचा हात आहे, असा खळबळजनक आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. भारताने या आरोपांचा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांमध्ये इन्कार केला होता. ट्रूडोंच्या आरोपामुळे संबंध तणावग्रस्त झाले आहेत.
भरातीय-प्रशांत सागरीय क्षेत्रासंबंधी भारताशी आमचे संबंध असणे महत्वाचे आहे. तथापि, या निज्जर हत्या संबंधांमध्ये आम्ही आमच्या देशातील कायद्यांच्या अनुसार चौकशी करत आहोत. आमच्या देशाचा नागरीक असणारा एक व्यक्ती आमच्याच देशात मारला गेला आहे. त्यामुळे आम्हाला या प्रकरणाची चौकशी करणे अनिवार्य आहे, असे वक्तव्य बिल ब्लेअर यांनी केले. भारताशी संबंध या प्रकरणानंतरही राहतीलच. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, अशी पुस्तीही बिल ब्लेअर यांनी त्यांच्या विधानात जोडली आहे.
पुरावे दिले नाहीत
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी निज्जर हत्या प्रकरणाचे कोणतेही पुरावे भारताला दिलेले नाहीत, या विधानाचा भारताने पुनरुच्चार केला आहे. भारताचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे विधान भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले आहे. दोन्ही देशांनी एका ज्येष्ठ दूतावास अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेशही दिला आहे. आता या प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव निवळावा, या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.