नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील इशरत जहाँच्या कथित बनावट चकमक प्रकरणाच्या तपासात सीबीआयला मदत करणारे वरि÷ आयपीएस अधिकारी सतीशचंद्र वर्मा यांना बडतर्फ करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका आठवडय़ासाठी स्थगिती दिली. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सोमवारी यासंबंधी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी खंडपीठाने बडतर्फीच्या निर्णयाला स्थगिती देत उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. बडतर्फीच्या आदेशाला स्थगिती द्यावी किंवा नाही यासंबंधीचा निर्णय उच्च न्यायालय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले. वर्मा यांना 30 सप्टेंबर रोजी नियोजित सेवानिवृत्तीच्या एक महिना अगोदर 30 ऑगस्ट रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. वर्मा यांनी 2004 च्या इशरत जहाँ प्रकरणाची एप्रिल 2010 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान चौकशी केली होती. त्यांच्या तपास अहवालाच्या आधारे, विशेष तपास पथकाने ही चकमक ‘बनावट’ असल्याचे म्हटले होते.