द. गो. जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी दिलेली माहिती
मडगाव : जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे 30 पंचायतींकडून विकासकामांसंदर्भातील यादी पाठविण्यात आलेली नसून ती पाठविण्यासाठी स्मरणपत्रे पाठविली जातील व सर्व पंचायतींकडून यादी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया मार्गी लावली जाईल, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायतींच्या कार्यकक्षेतील 25 मतदारसंघांत 89 पंचायतींचा समावेश असून त्यातील 59 पंचायतींनी पुरविण्यात आलेल्या नमुन्यानुसार यादी पुरविली आहे. उर्वरित 30 पंचायतींनी ती पुरवावी यासाठी स्मरणपत्रे पाठविण्याव्यतिरिक्त ज्या जिल्हा पंचायत सदस्यांच्या मतदारसंघांत या पंचायती आहेत त्यांना संपर्क साधून यादी सादर करण्यास सांगावे असे सांगण्यात आले आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले. बुधवारी बोलाविण्यात आलेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत बहुतेक सदस्यांनी वरील विषयाकडे लक्ष वेधले असता अध्यक्षांनी सद्यस्थितीची माहिती सदस्यांना दिली. जिल्हा पंचायत मतदारसंघांत विकासकामांसाठी सरकारकडून मिळालेल्या निधीतून नवीन विकासकामे मार्गी लावण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. काही ठेकेदारांना विकासकामे मार्गी लावण्यासाठी कामाचे आदेश देऊन कित्येक दिवस झाले, तरी कामे संथगतीने सुरू असल्याच्या कैफियती काही सदस्यांनी मांडल्या असता आपण सदस्यांना यासंदर्भात ठेकेदार आणि कामांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार ठेकेदारांवर आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन आपण दिले आहे, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली. जिल्हा भवनासाठीचा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला असून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जागेबाबत आम्ही पाठपुरावा करत असून ही मागणी पूर्ण होईल, असा विश्चास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.