फलक लावण्यासाठी परवानगी न घेतल्याने महापालिकेकडून मोहीम : काही व्यावसायिकांनी रस्त्यावरच उभारले कटआऊट
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलकांचा पेव वाढला असल्याने नामफलकाव्यतिरिक्त अन्य फलक लावण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण व्यावसायिकांनी याची दखल घेतली नसल्याने रस्त्यावर अनधिकृतरित्या लावण्यात आलेले जाहिरात फलक हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने शुक्रवारी राबविण्यात आली.
शहरात बॅनर आणि जाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र व्यावसायिक विनापरवाना बॅनर आणि जाहिरात फलक लावत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. काही व्यावसायिक रस्त्यावर मोठे कटआऊट लावत आहेत. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांचे जाहिरात फलक लावून वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्याशेजारी आणि दुभाजकावरील पथदीप खांबांवर शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशाबाबत अनधिकृत फलक लावण्यात आल्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे.
रस्त्यावर अनधिकृत बॅनर आणि जाहिरात फलक लावण्यात येवू नयेत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. नामफलकांव्यतिरिक्त अन्य फलक हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे कानाडोळा करून रस्त्याच्या बाजूला बॅनर, कटआऊट तसेच काही कंपन्यांच्या जाहिराती आणि शाळा-कॉलेज प्रवेशाबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाच्यावतीने शुक्रवारपासून अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर लावण्यात आलेले फलक अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या साहाय्याने हटविण्याची कारवाई राबविण्यात आली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
मोहीम..
- वाहतुकीस अडथळा होत असल्याचे निदर्शनास
- मनपा अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई