अंमलबजावणी सुरू : विशेष पद्धतीचे पावती बुक तयार, मास्टरप्लॅन उल्लेख असलेली पावती गाळेधारकांना मिळणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी मास्टरप्लॅन राबविला होता. या अंतर्गत नुकसान झालेल्या मालमत्ताधारकांना विविध ठिकाणी गाळे देण्यात आले आहेत. मात्र गाळेधारकांकडून भाडे आकारणी बंद करण्यात आल्याने नळजोडणी व विद्युतजोडणी मिळणे कठीण बनले आहे. पण या गाळेधारकांकडून आता महापालिका प्रशासन भाडे वसूल करणार असून याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू करण्यात आली.
कॉलेज रोड, काँग्रेस रोड, शहापूर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार अशा विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने मास्टरप्लॅन राबविला होता. रस्त्यांचे रुंदीकरण करताना अनेक मालमत्ताधारकांच्या इमारती हटविण्यात आल्या होत्या. काही व्यावसायिक गाळे आणि दुकाने हटविण्यात आल्याने असंख्य व्यावसायिक बेरोजगार झाले होते. काहीजण भाडेतत्त्वावर गाळे घेऊन व्यवसाय करीत होते. पण त्यांनादेखील व्यवसाय बंद करावे लागले. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेत महापालिकेने ठिकठिकाणी व्यापारी संकुलाची उभारणी करून नुकसानग्रस्तांना गाळे दिले होते. काही नागरिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या जागा दिल्या होत्या. काहींनी मनपाच्या जागेत स्व-खर्चाने गाळे बांधून व्यवसाय सुरू केला होता. अनगोळ नाका, नेहरुनगर, कपिलेश्वर तलावाशेजारी, शहापूर परिसरात तसेच फोर्ट रोड, देशमुख रोड, कला मंदिर अशा विविध ठिकाणी व्यापारी गाळय़ांची उभारणी केली होती. मात्र महापालिकेने कालांतराने गाळेधारकांकडून भाडेवसुली सुरू केली होती.पण 2010 पासून गाळेधारकांकडून भाडेवसुली बंद झाली होती. त्यामुळे गाळेधारकांना व्यवसाय परवाने घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील 12 वर्षांपासून भाडे पावती मिळाली नसल्याने नळजोडणी ंिकंवा विद्युतजोडणी करून घेताना अडचणी येत आहेत.
त्यामुळे व्यवसाय परवाना द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. महापालिकेने भाडे आकारणी बंद केल्याने महसूल उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गाळेधारकांकडून भाडेवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता विशेष पद्धतीचे पावती बुक तयार करण्यात आले आहे. मास्टरप्लॅन योजनेंतर्गत भाडेकरू असलेल्या गाळेधारकांकडून भाडे वसूल केल्यानंतर ‘मास्टर प्लॅन’ असा उल्लेख असलेली पावती दिली जाणार आहे.
महापालिकेला वर्षाला 80 लाखांपर्यंत भाडे मिळणार
या पावतीच्या आधारे व्यावसायिकांना व्यवसाय परवाना आणि नळजोडणी व विद्युतजोडणी करून घेता येणार आहे. मास्टरप्लॅनमधील नुकसानग्रस्तांच्या अडचणींची दखल घेऊन महापालिकेने नवीन पर्याय शोधला आहे. भाडे वसुलीसाठी बुधवारपासून चलन वितरित करण्यास प्रारंभ करण्यात आला. मास्टरप्लॅनमधील गाळेधारकांना भाडे पावती मिळणार आहे. पण मागील थकबाकी असलेले भाडे भरावे लागणार आहे. 500 हून अधिक गाळेधारक असून या माध्यमातून वर्षाला 80 लाखांपर्यंत भाडे महापालिकेला मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.