तीन जणांच्यावर गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एका अहवालाच्या नस्तींची चोरीची घटना घडली असून याप्रकरणी तीन जणांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कार्यालयातून नस्ती चोरी होत असल्याची घटना सातारा जिह्यात प्रथमच घडली असून या नस्ती चोरणाऱ्यांची नावे सुद्धा पूर्ण स्वरुपात नसल्याने यामागे गौडबंगाल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातारा शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. शासकीय कार्यालयात नस्तींची नोंद व ठेवणी योग्य पद्धतीने केली जाते. सध्या बहुतांशी कार्यालयात संगणकीय व्यवस्था आहे. मात्र, सातारच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सागर शिवाजी लाळगे(वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कार्यालयातून दि. 1 सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या काळात खटावकर, शिंदे आणि इतर एक अशा तिघांनी घोडके यांचा पाठवण्यात आलेल्या अहवालाच्या मुळ नस्तीच चोरुन नेल्या आहेत. चोरी करणारे तिघेही कार्यालयातीलच सहकारी असल्याचे नमूद केले असून त्यांची पूर्ण नावांचा उल्लेख करण्यात आलेला नसून यामागे गौडबंगाल असावे अशी चर्चा आहे. याचा तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे दत्ता पवार हे करत आहेत.