हुबळीतील नाविद अहमद, तौसिफच्या आवळल्या मुसक्या : अठ्ठेचाळीस तासांत कोलवाळ पोलिसांची यशस्वी कारवाई
म्हापसा : अस्नोडा येथील दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना हुबळी येथील घरात कोंडून ठेवून त्यांच्याकडून दागिन्यांची मागणी केलेल्या दोन्ही मुलींचा अठ्ठेचाळीस तासात शोध घेऊन त्यांची सुटका करत हुबळीतील दोन अपहरणकर्त्या युवकांच्या मुसक्या आवळण्यातही कोलवाळ पोलीस यशस्वी ठरले. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदशर्नाखाली उप निरीक्षक मंदार परब व पोलीस पथकाने हुबळीत जाऊन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले.
एक हिंदू, एक मुस्लिम मुलगी
याबाबत माहिती देताना दळवी म्हणाले, 29 मे रोजी रात्री 9 वा. याबाबत मुलींच्या वडिलांनी मुलींचे अपहरण झाल्याची माहिती कोलवाळ पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी तपासयंत्रणा गतिमान केली. एक हिंदू मुलगी व एका मुस्लीम मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत. एक 12 वर्षांची मुलगी तर दुसरी 15 वर्षांची मुलगी आहे. यामधील 12 वर्षीय मुलगी दिव्यांग आहे.
बंद घरात ठेवले होते कोंडून
संशयित या मुलींना घेऊन हुबळीच्या दिशेने गेल्याचे समजल्यावर पोलीस उपनिरीक्षक मंदार परब यांच्या नेतृत्वाखाली खास पोलीस पथक हुबळीच्या मार्गावर रवाना झाले. हुबळी कसाबपथ पोलीस स्थानकातील पोलिसांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. नाविद अहमद पानीबंद, (राहणारा टिपूनगर धारवाड) याने तेथील त्याच्या बंद घरात मुलींना केंडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
तपासाअंती नाविद याने आपला मित्र तौसिफ किल्लेदार उर्फ मुन्ना राहणारा धारवाड याने त्या दोन्ही मुलींना आपल्या घरात आणून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर तौसिफलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची काबुली दिली. दोघाही संशयितांनी त्या मुलींना दागिने घेऊन येण्यास सांगितले. याठिकाणी ऐशआरामी जीवन जगू, असे त्यांना आमिष दाखविले होते. मुलींकडील दागिने हुबळीतील सोनाराला विकले होते ते दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हुबळी येथे दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांना काल बुधवारी सायंकाळी गोव्यात आणले. त्यानंतर रितसर गुन्हा नेंद केला. पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक सोमनाथ माजिक, सीताकांत नाईक, यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक मंदार परब व उपनिरीक्षक कुणाल नाईक याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.