प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई जेएनएमसी रिसर्च युनिट ‘माता व नवजात शिशु’च्या आरोग्याबाबत सातत्याने संशोधन करत आहे. नुकतीच वॉशिंग्टनमध्ये ‘माता आणि नवजात शिशु’चे आरोग्य या विषयावर जागतिक परिषद पार पडली.
या परिषदेत केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे सहभागी झाले होते. परिषदेत केएलईचा जेएनएमसी महिला आणि शिशु विभाग दोन दशकांपासून महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्य समस्यांवर जे काम करत आहे, त्याबाबत माहिती देण्यात आली. प्रसूतीनंतर येणारा अशक्तपणा, लोहाचे प्रमाण, रक्तक्षय याबाबत परिषदेत चर्चा झाली. भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, केनिया, झांबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि ग्वॉटेमालामधील जागतिक नेटवर्क स्थानावर याबाबत संशोधन आणि अध्ययन केले जात आहे.
वॉशिंग्टनमध्ये ‘युनायस शॉवर केनेडी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ अँड ह्यूमन डेव्हलपमेंट’मध्ये 7 जून रोजी ‘ग्लोबल नेटवर्क फॉर रिसर्च ऑफ वूमन्स अँड चिल्ड्रन्स हेल्थच्या सुकाणू समिती’ची परिषद झाली. यामध्ये डॉ. प्रभाकर कोरे यांनी जेएनएमसीच्या संशोधनाबद्दल माहिती दिली.