जिल्ह्यातील तालुक्यांची वेगवेगळी तारीख जाहीर : तहसीलदारांकडून आरक्षण होणार जाहीर
बेळगाव : ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या आरक्षणाची तारीख जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यातील तहसीलदारांवर याबाबतची जबाबदारी टाकण्यात आली असून दि. 9 जून ते 21 जूनपर्यंत या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान यासाठी आवश्यक मार्गसूची जारी करण्यात आली असून याबाबत योग्य ती जागा निवडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी आता लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबतची उत्सुकता साऱ्यांना लागली होती. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांची रस्सीखेच होणार आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी आता गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. अध्यक्ष होण्यासाठी अनेकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच ग्राम पंचायतींचे आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कालावधी पूर्ण झाल्याने आता नव्याने आरक्षण जाहीर होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यात 9 जूनपासून आरक्षण जाहीर करण्यास सुरुवात होणार आहे. बेळगाव तालुक्याचे आरक्षण 20 जून रोजी जाहीर होणार आहे.
गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना
जिल्ह्यातील 500 हून अधिक ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी त्या-त्या तालुक्यातील ग्राम पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना याची माहिती देणे गरजेचे असून त्यांनाही यामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात यावे, असेही स्पष्ट केले आहे.
तारीखनुसार जाहीर करण्यात येणारे आरक्षण-
- तालुका आरक्षणाची तारीख देण्यात आलेला वेळ
- अथणी 9 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- कागवाड 9 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- रायबाग 12 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- मुडलगी 12 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- गोकाक 15 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- हुक्केरी 15 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- बैलहोंगल 16 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- सौंदत्ती 16 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- यरगट्टी 17 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- रामदुर्ग 17 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- खानापूर 19 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- कित्तूर 19 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5
- बेळगाव 20 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- dरनिपाणी 21 जून 2023 सकाळी 10 ते दुपारी 1
- चिकोडी 21 जून 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 5