कावेरीचे पाणी सोडल्याच्या विरोधात आंदोलन
प्रतिनिधी/ बेंगळूर
तामिळनाडूला कावेरी नदीचे पाणी सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. तर उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये संमिश्र आणि किनारपट्टी व मलनाड भागात निराशजनक प्रतिसाद मिळाला. राज्यात सर्वत्र धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. कोठेही अनुचित घटना घडल्या नाहीत.
कावेरी खोऱ्यातील बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, मंड्या तसेच रामनगर, चामराजनगर, हासन, चिक्कमंगळूर, कोलार, तुमकूर, चित्रदुर्ग धारवाड जिल्ह्यांत बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. दावणगेरे, विजापूर, बागलकोट, बेळगाव, शिमोगा, रायचूर, बळ्ळारी, गदग, कलबुर्गी, हावेरी विजापूर आणि कोप्पळ जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या जिल्ह्यांमध्ये दुपारी 12 नंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले. कोडगू, बिदर, मंगळूर, उडुपी, कारवार जिल्ह्यांत बंद अयशस्वी झाल्याचे दिसून आले.
दक्षिण कर्नाटक भागात बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. विविध संघटनांनी चौकाचौकात धरणे आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडूला पाणी सोडू नये, अशी मागणी केली. खासगी प्रवासी वाहन मालक संघटना, ऑटोरिक्षा चालक संघटनेनेही पाठिंबा दिल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. खबरदारी म्हणून परिवहनच्या बसेस बंद ठेवण्यात आल्याने अनेक प्रवाशांना बसस्थानकावरच ताटकळत रहावे लागले. रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ अत्यंत कमी होती. सायंकाळनंतर काही बसेस सोडण्यात आल्या.
विमानतळावर 5 जणांना अटक
भाजप, निजदसह चित्रपट कलाकारांनी बंदला पाठिंबा दर्शविला. बेंगळूरच्या देवनहळ्ळी येथील विमानतळावर सकाळी 9:50 च्या इंडिगो विमानाची तिकिटे खरेदी करून आत प्रवेश मिळविलेल्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. कर्नाटक बंदमुळे देशातील विविध ठिकाणांना जाणाऱ्या 60 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. बेंगळूरला उतरणाऱ्या 22 आज्ण बेंगळूरहून अन्यत्र जाणारी विमाने रद्द केल्याची माहिती विमानतळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.