वृत्तसंस्था/ राजकोट
इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर शेष भारत संघाने आपली स्थिती मजबुत केली आहे. रणजी चषक विजेत्या सौराष्ट्रचा संघ अद्याप पहिल्या डावात 96 धावांनी पिछाडीवर आहे.
या सामन्यात शेष भारत संघाने पहिल्या डावात 308 धावा जमविल्या. शेष भारताच्या डावामध्ये सलामीच्या साईसुदर्शनने 7 चौकारांसह 72, अगरवालने 6 चौकारांसह 32, कर्णधार हनुमा विहारीने 6 चौकारांसह 33, एस. भरतने 6 चौकारांसह 36, मुल्लानीने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32, सौरभ कुमारने 5 चौकारांसह 39 धावा जमविल्या. सौराष्ट्रतर्फे पार्थ भूत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 94 धावात 5 तर धर्मेंद्रसिंग जडेजाने 90 धावात 3 आणि दोडीयाने 74 धावात 2 गडी बाद केले.
शेष भारताने 8 बाद 298 या धावसंख्येवरुन सोमवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 2 गडी केवळ 10 धावा जमवित तंबूत परतले. त्यानंतर सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. आणि दिवसाअखेर त्यांनी पहिल्या डावात 80 षटकात 9 बाद 212 धावा जमविल्या होत्या. सौराष्ट्र संघातील वासवदाने 2 चौकारांसह 54, व्यासने 2 चौकारांसह 29, चेतेश्वर पुजाराने 4 चौकारांसह 29, प्रेरक मंकडने 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. शेष भारतातर्फे कवीरप्पा, सौरभ कुमार यांनी प्रत्येकी 3 तर मुल्लानीने 2 व नारंगने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : शेष भारत प. डाव 94.2 षटकात सर्व बाद 308 (साई सुदर्शन 72, अगरवाल 32, हनुमा विहारी 33, एस. भरत 36, मुल्लानी 32, सौरभ कुमार 39, पार्थ भूत 5-94, डी. जडेजा 3-90, दोडीया 2-74), सौराष्ट्र प. डाव 80 षटकात 9 बाद 212 (व्यास 29, पुजारा 29, वासवदा 54, मंकड 29, पार्थ भूत 20, उनादकट खेळत आहे 17, कवीरप्पा 3-28, सौरभ कुमार 3-64, मुल्लानी 2-46, नारंग 1-56).