वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लडाख या केंद्रशासित प्रदेशातील अनेक प्रतिबंधित स्थाने आता पर्यटनासाठी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्थाने लडाखमधील चांग चेन्मो विभागातील आहेत. हा भाग संवेदनशील मानला जातो. पूर्व लडाखमधील पेंगॉग सरोवराजवळ ही स्थाने आहेत. या स्थानांपासून नजीकच भारतीय सैनिक चीनी सैनिकांच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे असलेलेही दिसून येत आहेत. ही स्थाने दोन टप्प्यांमध्ये मुक्त करण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यात पर्यटकांना 18,314 फूट उंचीवरील मार्सिमिक ला या खिंडीपर्यंत जाण्यास अनुमती देण्यात येणार आहे. येथे सोगसालो हे स्थान आहे. येथेच रिमदी चू आणि चांग चेन्मो या नद्यांचा संगम आहे. हे स्थान भारत-चीन नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. दुसऱ्या टप्प्यात पर्यटकांना त्याही पुढे म्हणजे हॉट स्प्रिंग्जपर्यंत जाता येणार आहे. 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी येथे चीनच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 10 सैनिक हुतात्मा झाले होते. त्यांच्या स्मारकाचे दर्शनही पर्यटकांना घेता येणार आहे. ही स्थळे पर्यटकांसाठी मुक्त करण्यास भारतीय सेनेनेही अनुमती दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रदेश पर्यटकांना पाहता येणार आहे, असे भारतीय पर्यटन विभागाने शुक्रवारी एका वक्तव्यात स्पष्ट केले आहे.