अफगाणिस्तानमध्ये सध्या कट्टर धर्मवादी मानली जाणारी तालिबानी राजवट आहे. त्यामुळे जनतेवर सर्व प्रकारचे निर्बंध आहेत. खाणे, पिणे, पोशाख, शिक्षण, मनोरंजन, खेळ, इतकेच कशाला साधे रस्त्यावरून फिरणेही इस्लामच्या नियमानुसारच झाले पाहिजे, अशी या राजवटीची सक्ती आहे. विशेषतः महिलांच्या संदर्भात तर हे निर्बंध अधिकच कडक आहेत. मात्र, जनतेला अशी वेसण घालणाऱया तालिबानी सत्ताधीशांची वर्तवणूक मात्र अनिर्बंध अशा स्वरुपाची आहे.
हे तालिबानी कमांडर श्रीमंत जीवनशैली उपभोगत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही नियमांचे बंधन नाही. नुकताच एका तालिबानी कमांडरचा विवाह पार पडला. त्यावेळी त्याने वधुला आणण्यासाठी तालिबानच्या वायुदलाचे हेलिकॉप्टर वापरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर विशेष गाजत आहे. याच कमांडरने हुंडय़ाच्या रुपात 12 लाख अफगाणी रुपये दिले आहे. अफगाणिस्तानची दयनीय अर्थव्यवस्था लक्षात घेता हा खर्च अतिप्रचंड म्हणावा लागेल. अफगाणिस्तानसारख्या अतिगरीब देशाच्या ही अतिश्रीमंत जीवनशैली जगभर टीकेचा विषय बनली आहे.