सांगेली खळणेवाडीतील ग्रामस्थ व महिलांची मागणी
ओटवणे प्रतिनिधी
कोरोना काळात बंद केलेल्या माडखोल खळणेवाडी मार्गे सांगेली बसेस पूर्ववत सुरू करा अशी मागणी सांगेली -खळणेवाडीतील ग्रामस्थ व महिलांनी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी एसटी डेपोचे आगार प्रमुख श्री गावित यांच्याकडे केली आहे.
माडखोल खळणेवाडी मार्गे सांगेली या मार्गावर तीन वर्षांपूर्वी बसेस सुरू होत्या मात्र कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर या मार्गावर सध्या केवळ एकच बस सुरू आहे. मात्र या बसचा परतीचा प्रवास सांगेली धवडकी मार्गे माडखोल असा करण्यात आल्यामुळे खळणेवाडीतून सावंतवाडी व माडखोल मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोरोना काळात बंद केलेल्या दोन्ही बसेस पूर्ववत सुरू कराव्यात तसेच सध्या या मार्गावर सुरू असलेल्या बसचा परतीचा प्रवास पूर्ववत मार्गाने सुरू ठेवावा अशी मागणी सांगेली खळणेवाडीतील ग्रामस्थ व महिलांनी सावंतवाडी एसटी डेपोचे आगार प्रमुख श्री गावित यांच्याकडे केली.
यावेळी आगार प्रमुख श्री गावित यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जया सावंत, संतोष सावंत, वासंती सावंत, ज्योती सावंत, शितल सावंत, पुजा सावंत, दर्शना नाटलेकर, सरीता सावंत, राजश्री सावंत आदी महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते