पुणे / प्रतिनिधी :
देशाच्या वायव्य भागात येत्या काही दिवसांत पाऊस कमी होणार असून, मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानच्या भागातून 25 सप्टेंबरच्या आसपास सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरवर्षी साधारणपणे 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. गेल्यावर्षी 20 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. गेल्या काही वर्षात मान्सूनचा माघारीचा प्रवास उशिरा होत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर-पश्चिम तसेच पश्चिम-मध्य भारतात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पुढील पाच दिवस येथे पावसाची शक्यता कमी आहे. ऍन्टी सायक्लोन स्थिती सध्या या भागात आहे. यामुळे राजस्थानच्या अनेक भागात कोरडे वातावरण पसरले आहे. त्यामुळे 25 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू होणार आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पाऊस
झारखंड व लगतच्या भागावर असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, त्याचे पश्चिम झारखंड व लगतच्या भागावर हवेच्या द्रोणीय स्थितीत रुपांतर झाले आहे. तसेच सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाची रेषा पसरली आहे. या सर्वांच्या प्रभावामुळे राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून, गेले दोन दिवस दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागात मुसळधार पाऊस झाला, तर राज्यात इतरत्र यलो अलर्ट असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
चार दिवस पाऊस
पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात कमी अधिक पावसाचे प्रमाण राहील. काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.