केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांचे पती
बेळगाव : खानापूरच्या माजी तहसीलदार व सध्या हिडकल डॅम विशेष भूसंपादन अधिकारी पदावर असणाऱ्या केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. जाफर सादिक पिरजादे (वय 39, रा. रझा कॉलनी, बॉक्साईट रोड) असे त्यांचे नाव आहे. जाफर यांनी काही वर्षे बेळगाव तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणूनही सेवा बजावली असून सध्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात एफडीए म्हणून ते सेवेत होते. सोमवारी दुपारी आझमनगर येथील आपल्या भावाच्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जाफर यांची पत्नी केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी कामानिमित्त बेंगळूरला गेल्या असून त्या बेळगावात दाखल झाल्यानंतर यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश आवजी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे. यासंबंधी एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला असता आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, जाफरच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस स्थानकात सीआरपीसी कलम 174 अन्वये अनैसर्गिक मृत्यू प्रकरण नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.