प्रतिनिधी/ बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी शनिवारीही पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. सकाळी त्यांनी पथसंचलनाचीही पाहणी केली.
पोलीस परेड मैदानावर झालेल्या पथसंचलनात अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. दोन दिवसांचा दौरा आटोपून सायंकाळी ते बेंगळूरला रवाना झाले. यावेळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा आदींसह शहरातील इतर अधिकारी उपस्थित होते.
शस्त्रागाराला भेट देऊन सीएआर विभागातील शस्त्रास्त्रs व वाहनांची त्यांनी पाहणी केली. परेड मैदानावर शहरातील पोलीस अधिकाऱ्यांशी हितेंद्र यांनी संवाद साधला. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांच्या पाठोपाठ सोमवारी गृहमंत्रीही बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.