मूळ उत्तर प्रदेशचा चोरटा गजाआड रोकडसह दहा लाखाचे दागिने हस्तगत
प्रतिनिधी / म्हापसा
घरात कुणी नसल्याची संधी साधून रेवोडा सालचेभाट येथील विनोद विठ्ठल लोकरे यांच्या घरातील 10 लाख ऊपयांचे सोन्याचे दागिने व रोख ऊपये चोरीप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सुधीर रमेश सिंग (23 वर्षे, सध्या राहणारा रेवोडा, मूळ उत्तर प्रदेश येथील) याला अटक केली आहे. संशयित चोरट्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून सर्व दागिने व रोख रुपयेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
म्हापसा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान विनोद लोकरे घरातून बाहेर गेले असता चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख ऊपये दीड हजार पळविले असल्याची लेखी तक्रार लोकरे यांनी कोलवाळ पोलीस स्थानकात दिली होती.
नाकाबंदी करुन चौकशी
त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, सोनम वेर्णेकर, हवालदार रामा नाईक, ऊपेश कोरगावकर, पांडुरंग नाईक, शिपाई सुलेश नाईक, रामेश्वर गावस, निखिल नाईक, रोहीत शेटगावकर यांनी या रेवोडा परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी करुन येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांची चौकशी केली.
नाकाबंदीत सापडला चोरटा
नाकाबंदी दरम्यान सुधीर सिंग याची झडती घेतली असता त्याच्या संशयास्पद वागण्यावरून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बिगर गोमंतकीय गावोगावी राहून बंद घरांची प्रथम पाहणी करतात व नंतर अशा चोऱ्या करून पळ काढतात. यावर पोलिसांनी येथील नागरिकांची सीफॉर्म तपासणी करणे गरजेचे आहे अशी मागणी तेथील नागरिकांनी दै. ‘तऊण भारत’ला बोलताना दिली.
उपविभागीय पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळचे पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या चोरीचा अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन व पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी कोलवाळ पोलिसांचे अभिनंदन केले आहे.