‘मास्टर्स ईन एअरोस्पेस इंजिनिअरिंग’साठी सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची तरुणाई विविध क्षेत्रात चमकते आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी बेळगावच्या अनेक तरुणांना मिळत आहे. त्यापैकीच एक आहे रिहान शशांक लेंगडे. नासाच्या इंटर्नशिप प्रकल्पासाठी तो निवडला गेला आहे. या अंतर्गत त्याने दाखविलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘मास्टर्स ईन एअरोस्पेस इंजिनिअरिंग’च्या अभ्यासक्रमासाठी सदर्न कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला आहे. नासातर्फे झालेली त्याची निवड विशेष उल्लेखनीय आहे.
रिहानचे शालेय शिक्षण सेंट पॉल्समध्ये झाले. जीएसएसमध्ये पीयूसीनंतर तो जीआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेत उत्तीर्ण झाला. मात्र, एअरोस्पेस याच क्षेत्रामध्ये करिअर करायचे हे त्याने लहानपणापासून ठरविले होते. तो म्हणतो, मी लहानपणी जी कॉमिक्स वाचली त्यातून माझे कुतूहल चाळवले गेले. मुख्य म्हणजे हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे.
तुला नासाची इंटर्नशीप कशी मिळाली? या प्रश्नावर अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स ही जगातील सर्वात मोठी मेकॅनिकल क्षेत्रात काम करणारी परिषद आहे. त्याच्या इंटरनॅशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग काँग्रेस ऍण्ड एक्स्पोझीशन (आयएमईसी) जर्नलमध्ये मी ‘रॉकेट इंजिन ऍडव्हान्स डिझाईन’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्याचा संदर्भ प्रवेशावेळी महत्त्वाचा ठरला. शिवाय नासासाठी जी इंटर्नशीप आहे ती खरे तर परदेशातील विद्यार्थ्यांसाठीच असते. मात्र, वर्षातून एकदा इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ते संधी देतात. ही संख्या फक्त 15 ते 30 इतकीच असते. याच निकषावर जागतिक स्तरावर मी निवडला गेलो.
आता मी ज्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जात आहे ती निवडसुद्धा सोपी नसते. मुख्य म्हणजे सुरक्षिततेच्यादृष्टीने येथे अत्यंत गोपनियता पाळावी लागते. त्यामुळे मी या विद्यापीठाशी संपर्क ठेवून होतो तो गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असला तरी माझ्या पालकांनाही त्याबद्दल सांगितले नव्हते. तेथील तज्ञ आमची गुणवत्ता तपासत असतात. अचानकपणे मुलाखत घेतात आणि किती सातत्य आहे हे सतत पाहतात, असेही रिहानने सांगितले.
नासाचे कामसुद्धा कोणालाही सांगितले जात नाही. या क्षेत्रात काम करताना प्रत्येकवेळी आपण यशस्वी होऊच, असे नाही. अनेकदा अपयश येते. ते स्वीकारणे आणि पुढे जाणे या पलीकडे आपल्यासमोर पर्याय नसतो. माझ्या अनेक सहकारी मित्रांना सातत्याच्या अभावामुळे संधी मिळू शकली नाही. मात्र, मला याच विषयात रस असून पुढे खूप अभ्यासही करावयाचा आहे. प्रवेश सोपा नव्हता. व्हिसा मिळताना जवळजवळ महिनाभर सतत अनेक प्रश्न विचारले गेले. कॅलिफोर्नियातील विद्यापीठामध्येसुद्धा खात्री करून घेतली गेली. पण अशा वेळी वैतागणे किंवा निराश न होता सकारात्मक विचारांवर भर देणे महत्त्वाचे आहे, असे रिहान सांगतो.
रिहानला चित्रकलेची आवड आहे. कोणत्याही चित्रकलेच्या वर्गाला न जाता तो उत्कृष्ट चित्रे काढतो. त्यामुळे त्याने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. त्याला ट्रेकिंगची आणि वाचनाचीही आवड आहे. बेळगावचे ज्ये÷ उद्योजक प्रेमचंद लेंगडे व प्रभा लेंगडे यांचा तो नातू असून शिल्पा व शशांक लेंगडे यांचा मुलगा आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या देशासाठी नक्कीच करणार, अशी ग्वाही तो देतो.