जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनात बेळगावचा समावेश, जेएनएमसीच्या डॉक्टरांचा संशोधनात सहभाग
मनीषा सुभेदार /बेळगाव
बदलते तपमान प्रसूतीसाठी हानीकारक ठरते आहे, असा निष्कर्ष तज्ञ डॉक्टरांच्या संशोधनातून पुढे आला आहे. मुख्य म्हणजे हा अभ्यास जगभरातील सात देशांमध्ये व भारतातील दोन शहरांमध्ये झाला. त्यामध्ये बेळगाव शहराचा समावेश आहे. या संशोधनामध्ये बेळगावचा अंतर्भाव असणे ही जरी उल्लेखनीय बाब असली तरी बदलत्या तापमानाचा प्रसूतीवर परिणाम होत आहे, ही बाब मात्र निश्चितच खेदजनक आहे. युएसएच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ व अमेरिकेतील संशोधक तसेच भारत आणि पाकिस्तानमधील डॉक्टर ज्यामध्ये बेळगावच्या जेएनएमसीमधील डॉक्टरांचा समावेश आहे. यांनी केलेल्या अथक संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. या डॉक्टरांच्या समूहाने भारतात बेळगाव आणि नागपूर व पाकिस्तानमधील तट्टा येथील 1 लाख 26 हजार गर्भवती महिलांच्या आरोग्याचा पूर्ण अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. ‘ग्लोबल नेटवर्क ऑफ वुमन्स अॅण्ड चिल्ड्रन्स हेल्थ रिसर्च (एनआयसीएचडी) या संस्थेशी जेएनएमसीमधील महिला आणि बालआरोग्य विभाग 2008 पासून संलग्न आहे. जन्मत:च अर्भकांचा मृत्यू होणे किंवा मृत अर्भक जन्माला येणे (स्टील बर्थ) याचे प्रमाण वाढत का आहे? याचा अभ्यास या डॉक्टरांच्या पथकाने केला. त्यामध्ये त्यांना बदलते तापमान हे यासाठी कारणीभूत ठरत आहे. हे लक्षात आले. 2014 ते 2021 पर्यंतच्या गर्भवतींचा तपशील यामध्ये संकलित करण्यात आला आहे. बेळगावमध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील (आज 8 केंद्रे अस्तित्वात आहेत) गर्भवतींच्या आरोग्यावर आणि बाळाच्या वाढीवर पूर्ण लक्ष ठेवून त्यांच्या सर्व नोंदी टिपण्यात आल्या आहेत.
वाढत्या तापमानामध्ये अर्भकाचा जन्मत:च मृत्यू होणे, याबरोबरच अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ जन्माला येणे हेसुद्धा आढळून आले आहे. दक्षिण आशियामध्ये भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश, आफ्रिकेमध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (डीआरसी), झाम्बिया व केनिया तसेच सेंट्रल अमेरिकेमध्ये गोटेमाला येथील गर्भवतींच्या नोंदी या अभ्यासासाठी महत्त्वाच्या ठरल्या. सदर संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ ऑब्स्ट्रिशियन अँड गायनॉकॉलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. भारतातील उत्तर प्रदेशीय भागात व प्रामुख्याने रायचूर व बेळगाव येथे तापमान वाढीचा सामना केवळ गर्भवतींनाच नाही तर जनसमुहालाही करावा लागतोय. मात्र, इतर देशांच्या तुलनेत बेळगाव आणि नागपूरमध्ये तापमानवाढीचा गर्भवतींवर होणारा परिणाम हा बराचसा कमी आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. जागतिक पातळीवर अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या देशांमध्ये पाकिस्तानच्या तट्टा येथील तापमान सर्वाधिक म्हणजे 50 अंशापर्यंत गेलेले आढळले.
तापमानवाढीचा थेट परिणाम : डॉ. शिवप्रसाद गौडर
बेळगावमध्ये जेएनएमसीचे मुख्य संशोधक डॉ. शिवप्रसाद एस. गौडर, बायोकेमिस्ट्री विभागाचे मंजुनाथ सोमण्णावर व कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. अविनाश कवी यांचा या संशोधन पथकामध्ये समावेश आहे. बेळगाव व नागपूरमध्ये अनुक्रमे 40 ते 45 अंशापर्यंत तापमानवाढ झाली होती आणि त्याचा थेट परिणाम गर्भवतींवर झाला आहे, असे फिजिऑलॉजीचे प्राध्यापक व काहेरचे संशोधक संचालक डॉ. एस. एस. गौडर यांचे म्हणणे आहे.
तापमानवाढीचे परिणाम सिद्ध : डॉ. मंजुनाथ सोमण्णावर
तापमानवाढीमुळे होणारे परिणाम हे आता या निष्कर्षामुळे सिद्ध झाले आहे. वाढत्या तापमानाचा गर्भवतींवर परिणाम होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील? याचा अभ्यास करणे हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे, असे बायोकेमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक व जेएनएमसीच्या महिला आणि बालआरोग्य विभागाचे संशोधक समन्वयक डॉ. मंजुनाथ सोमण्णावर यांनी सांगितले.
गर्भवतींमध्ये शारिरिक बदल : डॉ. अविनाश कवी
वाढत्या तापमानाचा परिणाम गर्भवतींच्या शरीरातील पाणी (फ्लुईड) कमी होण्यामध्ये होतो. गर्भवतीला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. शिवाय नाळेमध्ये काही शास्त्राrय बदल होतात. मुदतीपूर्वी प्रसूती होते, अशी माहिती कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक व प्रकल्प समन्वयक डॉ. अविनाश कवी यांनी दिली.