दिल्लीत पुराचा धोका : उत्तर भारतात संततधार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर भारतात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश यासह अन्य राज्यांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. तसेच दिल्लीलाही वाढत्या पाणीपातळीचा सामना करावा लागत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने मैदानी भागातही पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
यमुना नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीने धोक्मयाची पातळी ओलांडली आहे. जुन्या रेल्वे पुलावरील यमुनेच्या पाण्याची पातळी सोमवारी दुपारी 3 वाजता 203.48 मीटर होती, तर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ती 204.94 मीटर इतकी वाढली आहे. तीच स्थिती तिसऱ्या दिवशीही कायम होती. राजधानी दिल्लीत बुधवारी पहाटे 5 वाजता यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढून 205.43 मीटर झाल्यामुळे दिल्लीतील लोकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. यापूर्वी जुलैमध्ये दिल्लीला पुराचा सामना करावा लागला होता. यमुना नदीच्या पाण्याने 13 जुलै रोजी 208.66 मीटर इतकी विक्रमी पातळी गाठली होती. 10 जुलैपासून सलग आठ दिवस यमुना नदी 205.33 मीटरच्या धोक्मयाच्या चिन्हावरून वाहत होती.
हरियाणाच्या यमुनानगर जिह्यातील हथिनीकुंड बॅरेजमधील प्रवाह 30,153 क्मयुसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात संततधार पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. दिल्ली सरकारच्या पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरू शकते, परंतु परिस्थिती गंभीर होण्याची शक्मयता नाही.