प्रतिनिधी वाकरे, कोल्हापूर
Kolhapur Robbery News : गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगे (ता. करवीर) येथे भर चौकात असणाऱ्या कात्यायनी ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी सिनेस्टाईलने गोळीबार करत दरोडा घालता.यामध्ये तब्बल तीन किलो सोन्याचे दागिणे आणि रोख दोन लाख रूपये, असा एकूण 1 कोटी 82 लाखांची लूट केली.यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात मालक ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय 40, रा. बालिंगे) आणि त्यांचे मेव्हणे जितू मोडाजी माळी (वय 26) दोघे जण जखमी झाले.त्यांना उपचारासाठी कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दरोडयामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी,बालिंगे येथील मुख्य रस्त्यावर रमेश शंकर माळी यांचे कात्यायनी ज्वेलर्स आहे मडिया-शिरोही (राजस्थान) येथील मूळचे असणारे माळी हे कुटुंबासह गेली तेवीस वर्षे बालिंग्यातच राहतात.दुकानात त्यांचा मेव्हणा जितू मोडाजी माळी आणि मुलगा पियुषही (वय 14) असतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते तिघे दुकानात होते. यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरुन चौघे दुकानात आले.त्यांच्यापैकी एकाने हेल्मेट घातले होते. अन्य तिघांनी मास्क परिधान केला होता. त्यांच्यातील दोघांकडे रिव्हॉल्वर होते.त्यापैकी तिघे आत गेले.एक जण बाहेरच थांबला.आत गेलेल्या तिघांनी माळी यांच्याकडे शोकेसच्या चाव्या मागितल्या.पण चाव्या लवकर न सापडल्याने दरोखोरांनी शोकेसवर गोळीबार करुन काच फोडली.यानंतर त्यांनी शोकेसमधील सोन्याच्या दागिन्यांचे ट्रे पोत्यात भरण्यास सुरुवात केली.यावेळी रमेश माळी आणि जितू माळी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एकाने रमेश माळी यांना बेसबॉलच्या स्टीकने मारहाण करुन जखमी केले.
दुसऱ्या दरोडेखोरांने जितू आणि रमेश यांच्यावर यांच्यावर गोळी झाडली.जितू यांच्या पायाला तर रमेश यांच्या दंडाला गोळी लागली.स्टीकची मारहाण आणि गोळी लागल्याने रमेश खाली कोसळले.दरोडेखोर लूट करुन दुकानाच्या बाहेर जात असताना जितू माळी यांनी बाहेर येत आरडाओरडा केला.पण दरोडेखोरांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या काचेच्या दरवाजावर गोळीबार करुन तो फोडला.या गोळीबारामुळे माळी बाहेर येऊ शकले नाहीत.यावेळी दरोडेखोरांनी दागिण्यांनी भरलेले पोते दुचाकीवर घेऊन कळे-गगनबावड्याच्या दिशेने पलायन केले.युवक पाठलाग करत असताना त्यांनी दुचाकीवरून फायरिंग केले.पण सुर्दैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.जखमी रमेश माळी आणि जितू माळी या दोघांना तातडेने कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.रमेश यांची प्रकृती गंभीर आहे.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट-
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,अप्पर अधीक्षक जयश्री देसाई,करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, करवीरचे निरीक्षक अरविंद काळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
चांदीचे दागिने सुरक्षित, रेकी केल्याचा अंदाज
दरोड्याचे संपूर्ण नियोजन करून आलेल्या चारही दरोडेखोरांनी ज्वेलर्समधील सोन्याचे दागिणे आणि रोख रकमेवर डल्ला मारला. मात्र शोकेसमधील चांदीचे दागिणे आणि मूर्तींना हातही लावला नाही. दरोडेखोरांनी काही दिवस आधी माळी यांच्या ज्वेलर्सच्या दुकानाबरोबर आसपासच्या भागाची रेकी केली असावी. दरोडा घातल्यानंतर पलायन करताना कसे जायचे या संदर्भातही त्यांनी माहिती घेतली असावी. चारहीजण ज्या सहज पद्धतीने फरार झाले, ते पाहता त्यांनी सशस्त्र दरोडा घालण्यापूर्वी संपूर्ण रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवड्यातच सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा पडला होता.त्यावेळीही दरोडेखोरांनी गोळीबार करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.त्याप्रमाणे बालिंगा येथेही अशीच घटना घडली.
गावातील युवकांचे धाडस
दरोडेखोरांनी लूट करून जात असताना कुणीही अटकाव करू नये यासाठी पुन्हा फायरिंग केले. फायरिंग सुरू असताना गावातील युवकांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले.त्यांनी दगडफेक करून दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला.
श्वानाने शंभर मीटरपर्यंत माग काढला
पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास श्वानपथक पाचारण केले. बेली या श्वानाने कात्यायनी ज्वेलर्सपासून महात्मा फुले ग्राहक भांडारपर्यंत अवघ्या शंभर मीटरपर्यंत माग काढला आणि त्याच ठिकाणी घुटमळले. त्यावरून दरोडेखोर कळे-गगनबावडा दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. ठसे तज्ञांनाही पाचारण केले.त्यांच्याकडून घटनास्थळावरून दरोडेखोरांचे ठसे व इतर फॉरेन्सिकच्या दृष्टीने महत्वाची माहिती घेण्यात आली.
दरोड्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरोड्याचा थरारक प्रकार ज्वेलर्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचबरोबर या ज्वेलर्सच्या रोडवर असणाऱ्या इतर दुकानांच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही घटना कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार आहे.
मास्क,हेल्मेट घातलेले दरोडेखोर मराठी बोलत होते
दरोडेखोरांपैकी एकाने हेल्मेट घातले होते,तर इतर तिघांनी तोंडावर मास्क परिधान केला होता.सर्वजण मराठी बोलत होते.आडवे येऊ पाहणाऱ्यांना ते चला बाजूला व्हा,अशा भाषेत सुनावत होते.एखाद्या हिंदी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे हा दरोडा घालण्यात आल्याची चर्चा बालिंगा रोड आणि गावात होती.
दोन पिस्टलमधून 15 राऊंड फायरिंग
ज्वेलर्स दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चारपैकी दोन दरोडेखोरांनी 9 एमएमच्या दोन पिस्टलमधून तब्बल 15 राऊंड फायरिंग केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.दरोडेखोरांनी लूट करताना एक मॅगझीन रिकामे केल्याचे पोलिसांनी सांगितले.दरोडेखोरांनी गुन्ह्यात काळ्या रंगाच्या पल्सर आणि स्पेंडरचा वापर केला.ज्वेलर्सच्या दुकानाकडे येत असताना त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावरच फायरिंग केल्याची परिसरात चर्चा होती.फायरिंगच्या आवाजामुळे स्थानिक नागरिकही दहशतीखाली गेले.