पुणे / वार्ताहर :
धनकवडी परिसरातील एका सोसायटीत राहणाऱया कुटुंबाच्या घरी दहाजणांनी अँटी करप्शनचे अधिकारी आणि पत्रकार असल्याचे बतावणी करत छापेमारी केली. छापेमारीच्या बहाण्याने या भामटय़ांनी 14 हजार रुपयांची रोकड आणि 70 हजार रुपयांचे 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 84 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याप्रकरणी सीमा शशिकांत शिंदे (वय 30, रा. इंदिरानगर, पुणे), अर्चना नायडू यांच्यासह अन्य चार महिला व तीन पुरुष अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 40 वषीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारीला तक्रादार महिलेच्या घरी दहा जणांनी ऍन्टी करप्शनचे अधिकारी आणि पत्रकार असल्याची बतावणी करत छापा टाकला. तुम्ही इथे वेश्याव्यवसाय चालवता, तुमच्या विरोधात केस करतो अशी धमकी देऊन त्यांच्यासह त्यांच्या मुलांना आणि भाचीला हाताने मारहाण केली. तसेच हे प्रकरण इथेच मिटविण्यासाठी छापेमारीच्या बहाण्याने ताब्यात घेतलेली 14 हजारांची रोकड आणि 70 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. संबंधित प्रकार तक्रारदार महिलेच्या ओळखीच्या सीमा शिंदे यांनी घातला असावा असा संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तपासादरम्यान, सीमा शिंदे हिनेच सहकाऱयांच्या मदतीने हा छापा टाकून लुटमार केल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक एस शेंडे अधिक तपास करत आहेत.