पुणे / प्रतिनिधी :
कंत्राटी भरतीसह स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, दत्तक शाळा योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुण्यात महात्मा फुले वाडा येथे लाक्षणिक उपोषण केले. या प्रश्नी तोडगा काढावा. अन्यथा, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी व युवकांच्या मदतीने येत्या १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान उपोषण करण्याचा इशारा देत राज्य सरकारला पवार यांनी २० दिवसांचा अल्टीमेटम दिला.
मागील काही दिवसांपासून पदभरती, कंत्राटी भरतीशी संबंधित विविध मुद्दयांवर रोहित पवार सरकारला धारेवर धरत आहेत. शिक्षक भरतीसाठी मंत्रालयासमोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. पण त्यापूर्वीच भरती प्रक्रिया सुरू झाली. आता पुन्हा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भाजपकडून आपल्याला ट्रोल केले जात असल्याचे सांगत पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी आपण महाराष्ट्र पेटवत असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे, असे म्हटले होते. तसेच होय मी पेटवतोय महाराष्ट्र, असे म्हणत प्रत्युत्तरही दिले होते.
या पार्श्वभूमीवर महात्मा फुले वाडा येथे रोहित पवार यांनी उपोषणास्त्र उगारले. राष्ट्रवादीचे अन्य कार्यकर्तेही यात सहभागी झाले. लाक्षणिक उपोषणानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी सरकारला पुन्हा अल्टीमेटम देत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, अराजकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही प्रातिनिधिक उपोषण केले. प्रस्थापितांविरोधात सामान्य लोकांसाठी जिथून लढा उभा राहिला, तिथे उपोषण केले. कंत्राटी भरतीच्याविरोधात आम्ही उपोषण केले. सुमारे ७५ हजार जणांना कंत्राटी भरतीद्वारे घेतले जाणार आहे. यामध्ये कंत्राटदार मोठा होणार आहे.
तलाठीसह इतर भरतीसाठी हजार रुपये बंद करून ते विद्यार्थ्यांना परत द्यावेत. सरकारची फी भरण्यासाठी एका-एकाने १० ते १५ हजार रुपये भरले आहेत. ते पैसे त्यांना परत मिळायला हवेत. तलाठी भरतीसाठी एका पदाला १५ ते २५ लाख रुपये घेतले गेले. अशाप्रकारे पेपरफुटी होत असेल, तर राजस्थानच्या धर्तीवर कायदा करावा. तलाठी भरतीत अनियमिता झाली असेल, तर एका समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, या मागण्यांसाठी आम्ही उपोषण केल्याचे पवार यांनी सांगितले.