वृत्तसंस्था /मुंबई
सध्या भारतात सुरू असलेल्या 2023 च्या आयसीसी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने बिनधास्त खेळ करण्याचे तंत्र अवलंबले असून भारतीय क्रिकेट संस्कृतीमध्ये झालेल्या या बदल प्रक्रियेचा खरा हिरो कर्णधार रोहित शर्माच असल्याचे प्रतिपादन इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने केले आहे. आयसीसीच्या गेल्या दोन टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना आक्रमक आणि बिनधास्त खेळ करण्याचे तंत्र अवगत झाले. दरम्यान 2021 च्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला सुपर-12 फेरी पार करता आली नव्हती. भारतीय संघाला या स्पर्धेत उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा अभ्यास भारतीय संघाने खोलवर करून त्यांनी आपल्या खेळामध्ये आक्रमकता आणण्यावर भर दिला आणि 2023 च्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत या निर्धास्त खेळाचे तंत्र अवलंबल्याने भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेमध्ये त्यांनी सलग दहा विजय नोंदविण्याचा विक्रमही केला. बुधवारच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. दरम्यान बुधवारी प्रसिद्धी झालेल्या वृत्तपत्रांमध्ये भारतीय संघाच्या विजयाला ठळक प्रसिद्धी पहिल्या पानावर देण्यात आली. त्यामध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांना प्राधान्य देण्यात आले.. पण भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याची कामगिरी कर्णधार रोहित शर्माने केल्याने तोच भारतीय संघाचा खरा ‘हिरो’ असल्याची प्रतिक्रिया माजी कर्णधार नासिर हुसेनने स्काय स्पोर्ट्स चॅनेलवर व्यक्त केली आहे.