वृत्तसंस्था/ रियाद
येथे गुरुवारी होणाऱया एका प्रदर्शनीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात अर्जेंटिनाचा मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो यांचा सहभाग राहणार आहे. सौदी अरेबियातील फुटबॉल शौकिनांना पुन्हा या दोन आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याची संधी लाभणार आहे.
पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोने अलीकडेच सौदी अरेबियाच्या अल नासेर क्लबशी करार केला होता. या प्रदर्शनीय सामन्याची सर्व तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. फुटबॉल शौकिनांनी ऑनलाईनद्वारे तिकीटे खरेदी केली असून सुमारे 20 लाख डॉलर्सची कमाई तिकीट विक्रीतून झाली आहे. रियाद एसटी इलेव्हन आणि पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) यांच्यात हा प्रदर्शनीय सामना खेळवला जाणार आहे. कतारमध्ये अर्जेंटिनाला फिफाचा विश्वचषक मिळवून देणारा लायोनेल मेसी पीएसजी संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. व्हीआयपी कक्षासाठी या सामन्याची काही तिकीटे बोलीच्या रुपाने विकली गेली. या माध्यमातून सुमारे 10 दशलक्ष रियाल्स (2.66 दशलक्ष डॉलर्स) ची कमाई झाली आहे. सौदीमध्ये रोनाल्डोने गेल्या रविवारी सौदी प्रो लिग फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग दर्शवला होता.