वृत्तसंस्था/ बेंगळूर
हॉकी इंडिया आयोजित तिसऱ्या वरिष्ठ पुरुषांच्या आंतरविभागीय राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी आरएसपीबी, एफसीआय, कॅनरा बँक आणि पीएसपीबी या संघांनी शानदार विजय नोंदवले.
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी झालेल्या अ गटातील पहिल्या सामन्यात रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने (आरएसपीबी) सेंट्रल रिझर्व्ह पोलीस संघाचा 3-0 असा पराभव केला. विजयी संघातर्फे अमित रोहिदास, हर्षसाहीब सिंग आणि जोगिंदर सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. अ गटातील दुसऱ्या सामन्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) संघाने स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ गुजरात संघाचा 7-0 असा फडशा पाडला. विजयी संघातर्फे अभिषेक गांधीने तसेच योकेश्वरन यांनी प्रत्येकी दोन गोल तर समर्थ प्रजापती, ए. नाचाप्पा आणि रिंकू अँटील यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. ब गटातील एका सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने (पीएसपीबी) स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) संघाचा 6-2 असा पराभव केला. ब गटातील अन्य एका सामन्यात कॅनरा बँकेने तामिळनाडू पोलीस संघाचा 6-5 अशा गोलफरकारने पराभव केला.