शिक्षक भरतीसाठी उषाताई गोगटे शाळेत कागदपत्रांची तपासणी : पालकांचीही ओढाताण
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक भरतीसाठी पाटील गल्ली येथील उषाताई गोगटे शाळेमध्ये कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी उमेदवारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही धावपळ सुरू आहे.
बेळगावसह राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी सीईटी घेण्यात आली होती. सीईटीतील उत्तीर्ण उमेदवारांचे रॅंकिंग लावण्यात आले आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाचा दर्जादेखील घसरत असल्याने राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली आहे.
दरवेळी क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. पण कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने सध्या उषाताई गोगटे शाळेमध्ये प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक दिवशी विषयवार उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
शिक्षकच पुन्हा झाले उमेदवार
काही शिक्षक सध्या शाळांवर सेवेत आहेत. मात्र, त्यांना इतरत्र बदली मिळावी म्हणून त्यांनी पुन्हा शिक्षक भरतीमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु या प्रकारामुळे बेरोजगार डीएड व बीएडधारकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. इतर उमेदवारांना मिळणारी संधी हुकली असून रिक्त जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.