ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Russia fires 75 missiles at Ukraine क्रीमियात झालेल्या स्फोटाला जबाबदार धरत रशियाने युक्रेनवर तब्बल 75 क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 70 लोक जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा रशियाने हा हल्ला केला. रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येते.
लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा ताबा मिळवला असल्याने रशिया अधिक खवळला आहे. त्यातच क्रीमियामधील स्फोट, हा स्फोट युक्रेनने ठरवून घडविल्याचा आरोप रशियाने केला आहे. मात्र, युक्रेनने क्रीमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित आरोप फेटाळल्याने रशियाने युक्रेनला पुन्हा लक्ष्य केलं. सोमवारी रात्री रशियाने युक्रेनवर 75 क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठं नुकसान झालं आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आलं होतं. या क्षेपणास्त्रं हल्ल्याचं मुख्य उद्दीष्ट युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्रोत आणि ऊर्जा सुविधांचं नुकसान करणं हे होतं. पण यात सर्वसामान्य 11 लोकांचा बळी गेला आहे. तर जवळपास 70 जण जखमी आहेत.
रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियाचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जे युद्ध मैदानात व्हायला हवं ते शहरातील शांततापूर्ण भागात होत आहे. जितकं शक्य होईल तितकं नुकसान पोहोचवणं हे त्यांचे उद्दीष्ट आहे. रशियाच्या हल्ल्यात आमच्या निष्पाप लोकांचाही बळी जात आहे.