रशियातील 5 शहरांवर जोरदार हल्ले : नागरिकांचे पलायन सुरू : रशियाच्या सैनिकांवर विश्वास नसल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने मंगळवारी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या शहरात हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 6 जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर युक्रेनने पेलेल्या प्रतिआक्रमणामुळे रशिया जेरीस आल्याचे चित्र आहे. रशियाच्या सीमावर्ती भागांमध्ये आता नागरिकांचे पलायन सुरू झाले आहे. युक्रेनला लागू असलेला रशियाचा शेबेकिनो भाग आता पूर्णपणे निर्जन ठरला आहे.
40 हजार लोकसंख्या असलेल्या शेबेकिनोसह आणखी 4 ठिकाणांहून लोकांनी पलायन केले आहे. सीमावर्ती भागांमधील रुग्णालयांची स्थिती तर अत्यंत बिकट आहे. येथील रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. तसेच औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. रशियाचे सैनिक आमचे रक्षण करू शकणार नाहीत असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.
युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियाच्या सीमावर्ती भागांमध्ये 12 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या हल्ल्यांमुळे शेबेकिनो आणि बेलगोरोद येथील घरे तसेच इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
रशियाच्या सैन्याधिकाऱ्याचा मृत्यू
रशियाच्या 35 व्या कंबाइंड आर्म्स आर्मीचे चीफ ऑफ स्टार मेजर जनरल सर्गेई गोर्याचेव्ह हे 12 जून रोजी दोनेत्स्क क्षेत्रातील युक्रेनच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. या क्षेत्रातील 4 गावांना युक्रेनने रशियाच्या कब्जातून मुक्त करविले होते. गोर्याचेव्ह हे रशियन जनरल्समध्ये पाचव्या रँकचे अधिकारी होते..
युद्धनायकांचे समर्थन करण्याची वेळ
युद्ध संपत नसल्याने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची देशांतर्गत स्थिती आव्हानात्मक ठरत चालली आहे. लोकांचे समर्थन मिळविण्यासाठी पुतीन यांना युद्धात साथ देण्याचे आवाहन करावे लागले आहे. हा कठिण काळ असून अशा स्थितीत रशियाच्या लोकांनी देशभक्ती दाखवून द्यावी. विशेष सैन्य अभिनयात तैनात आमच्या नायकांसोबत उभे राहण्याची ही वेळ असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
पुरेशी शस्त्रास्त्र नाही
क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन बैठक बोलाविली होती. युक्रेनच्या प्रतिआक्रमणाला तोंड देण्यासाठी पुरेशी शस्त्रास्त्रs नसल्याची कबुली पुतीन यांनी या बैठकीत दिली.
युक्रेनच्या झेंडा फडकला
युक्रेनच्या सैन्याने नेसकुचने शहरात रशियाच्या ताब्यातील एका इमारतीवर नियंत्रण मिळवत त्यावर देशाचा झेंडा फडकविला आहे. तर जपोरिजिया क्षेत्रात रशियाच्या सैन्याचे वरिष्ठ अधिकारी ब्लादिमीर रोगोव्ह यांना जीव गमवावा लागला आहे. 16 महिन्यांपासून सुरू असलेल्या या सैन्य मोहिमेत आमच्याकडे अनेक गोष्टींची कमतरता निर्माण झाली आहे. यात शस्त्रास्त्रs, विमाने अन् ड्रोन्सचा समावेश आहे. रणगाडे अन् रणगाडाविरोधी शस्त्रास्त्रांची कमतरता आहे. परंतु आमच्या कंपन्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीला वेग देत असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. सीमेनजीक युक्रेनचे हल्ले सुरूच राहिल्यास ब्लॅक सी ग्रेन करार रद्द करू अशी धमकी पुतीन यांनी दिली आहे.