रशियाचा काळ्या यादीत समावेश होण्याची भीती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि रशियाचे संबंध दोन्ही देशांच्या विदेश धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारत नेहमीच रशियाला एक विश्वासार्ह भागीदार मानत आला आहे. परंतु आता हे संबंध बदलू लागले आहेत. एका वृत्त अहवालानुसार रशियाने भारताला ऊर्जा अन् शस्त्रास्त्रांचा व्यवहार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. जूनपर्यंत रशिया फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ब्लॅक लिस्टमध्ये सामील होऊ शकतो. या यादीत स्वत:चा समावेश टाळण्यासाठी रशियाने भारताकडे मदत मागितली आहे. मदत न केल्यास किंवा यात अपयशी ठरल्यास भारतासोबतचे व्यवहार रद्द करण्याचा इशारा रशियाने दिला आहे.
एकाकी पडलेल्या रशियाने भारताकडून मदत मागितली आहे. एफएटीएफच्या धास्तीमुळे रशिया आता तातडीने पावले उचलू लागला आहे. एफएटीएफ ही मनी लॉन्डिंग आणि दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्यावर बंदी घालणारी संघटना आहे. जून महिन्यात एफएटीएफची बैठक होणार असून यात रशियावर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत एफएटीएफचा सदस्य आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रनेवर युद्ध लादल्यावर एफएटीएफने त्याचे सदस्यत्व संपुष्टात आणले होते. याचमुळे रशिया आता स्वत:ला काळ्या यादीत समाविष्ट होण्यापासून अनेक देशांकडे मदत मागत आहे.
निर्बंधांमुळे रशिया बेहाल
युक्रेन युद्धामुळे यापूर्वीच रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा स्थितीत एफएटीएफकडून काळ्या यादीत समावेश करण्यात आल्यास म्यानमार, उत्तर कोरिया आणि इराणच्या श्रेणीत रशिया मोडणार आहे. रशियाचा काळ्या यादीत समावेश झाल्यास एफएटीएफचे सदस्य, बँका, गुंतवणूक कंपन्या आणि पेमेंट सिस्टीमला अनेक पावले उचलावी लागतील. निर्बंधांमुळे बेहाल झालेल्या रशियाचा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये अंतर्भाव झाला तरीही त्याची अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता आहे.
काळ्या यादीत समावेश झाल्यास…
काळ्या यादीत समावेश झाल्यास दोन्ही देशांमधील संरक्षण, ऊर्जा आणि इतर करार संकटात सापडतील असा इशारा रशियाने भारताला दिला आहे. शस्त्रास्त्रांची निर्यात, तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि नायरा एनर्जी लिमिटेडमधील सहकार्य, रेल्वे कॉरिडॉरचा विकास प्रकल्प इत्यादी करारांवरून रशियाने हा इशारा दिला आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. तसेच मागील वर्षी तो कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार देखील ठरला आहे.