डॉ. हेडगेवार विद्यालय व कला, संस्कृती खात्याचे संयुक्त आयोजन
वार्ताहर /पणजी
कुजिरा-बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालय व कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन ‘गोंय म्हजे गायता’ या गीतगायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस कवळे-फोंडा येथील एस.एस. समिती उच्च माध्यमिक विद्यालयाने पटकाविले. त्यांना रु. 5000 आणि स्मृतीचषक प्राप्त झाला.
कुजिरा येथील डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाने ‘गोंय म्हजे गायता’ ही आगळीवेगळी गीतगायन स्पर्धा येथील कला आणि संस्कृती भवन सभागृहात आयोजित केली होती. राज्यातील एकूण आठ उच्च माध्यमिक विद्यालयांनी यात सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत प्रथमच विद्यार्थ्यांबरोबर व्यवस्थापनातील कर्मचाऱयांनाही या स्पर्धेत भाग घेण्याची संधी प्राप्त करण्यात आली होती. प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी वर्गाने गोव्यातील पारंपरिक वेषभूषा करून खास संगीत शिक्षकांनी मराठी-कोकणी गाणी संगीतबद्ध केली होती. त्यात मांडो, कुणबी, तालगडी अशी विविध पारंपरिक गीते सादर केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री गावडे म्हणाले की, गोव्याची पारंपरिक संस्कृती ग्रामीण भागातील लोकांनी जपून ठेवली आहे. ती तशीच कायम ठेवण्याची जबाबदारी आता युवा पिढीच्या हाती आली आहे. डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाने ‘गोंय म्हजे गायता’ ही स्पर्धा आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे, असे म्हणून त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक आमोणकर उपस्थित होते. संपदा सवाते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रिती पै यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला.
या स्पर्धेतील द्वितीय बक्षीस हळदोणा येथील सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालयाने तर तृतीय बक्षीस कुंकळ्ळी युनायटेड उच्च माध्यमिक विद्यालयाने पटकाविले. त्यांना अनुक्रमे रु. 4000 व रु. 3000 रोख तसेच स्मृतीचषक प्रदान करण्यात आला. प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस विश्वनाथ महादेव परुळेकर विद्यालय, वेरें-बार्देश, द्वितीय सत्यवती सोयरू आंगले, माशे-काणकोण तर तृतीय उत्तेजनार्थ कांदोळी बार्देश येथील बक्षीस सेंट ट्रेसा उच्च माध्यमिक विद्यालयाला प्राप्त झाले.
उत्कृष्ट गीत लेखनाचे बक्षीस शिक्षिका शर्ली फुर्तादो (सांताक्रूझ) यांना मिळाले तर उत्कृष्ट संगीत कुंकळ्ळी येथील युनायटेड विद्यालयाला प्राप्त झाले. कोलवाळ येथील डायगो वाझ विद्यालय, खोर्ली-पिडीए कॉलनी येथील मडकईकर विद्यालय व सेंट थॉमस विद्यालय, हळदोणा या पथकांनीही उत्कृष्ट गीते सादर करून रसिकांकडून दाद मिळविली. स्पर्धेचे परीक्षण नामवंत वाद्यकलाकार विष्णू शिरोडकर, संगीत क्षेत्रातील शिल्पा बखले व प्रकाश देसाई यांनी केले.
बक्षिसवितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद खांडेपारकर व विद्यालयाचे प्राचार्य दीपक आमोणकर, परीक्षक प्रकाश देसाई, विष्णू शिरोडकर, शिल्पा बखले उपस्थित होते. यावेळी शिक्षक अमरनाथ पणजीकर, शिक्षिका शर्ली फुर्तादो यांनी स्पर्धेविषयी, पारंपरिक संस्कृतीसंबंधी विचार मांडून विद्यालयाचे अभिनंदन केले. दीपक आमोणकर यांनी स्पर्धा आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. शिक्षिका विद्या नायक यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षिका संपदा सवाते यांनी आभार मानले.