पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल बुधवारी पहिल्यांदाच राज्यसभेत केलेल्या इंग्रजी भाषणातून सरकारने मांडलेल्या जनविश्वास दुरुस्ती विधेयक 2023 चे समर्थन केले. या विधेयकाचा गोव्यासारख्या छोट्याशा व प्रगत राज्याला लाभ होईल, असे ते म्हणाले. आपल्याला पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या तिघांचे सहकार्य मिळाले व आपण संसदेत पोहोचलो, याचा उल्लेख करून त्यांनी तिघांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर विधेयकाचे समर्थन करताना त्यांनी हे विधेयक फार महत्त्वाचे व उपयुक्त आहे. छोट्या छोट्या गुन्ह्यांतून केवळ दंडात्मक कारवाई करून संबंधितांची सुटका होऊ शकते. त्यातून अटक करून तुरुंगात टाकण्याची गरज भासणार नाही. संबंधित खात्यांचे अधिकारी दंड ठोठावू शकतात. न्यायालयात जाऊन तोडगा काढण्याची गरज राहणार नाही. त्या ऐवजी दंडात्मक कारवाईतून संबंधितांची मुक्तता होऊ शकते. यामुळेच हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे आहे, असे खासदार तानावडे म्हणाले.
या नव्या कायद्यामुळे वारंवार छोट्या छोट्या गोष्टींसाठी न्यायालयात जाण्याची व न्यायालयांवर वाढता बोजा टाकण्याची गरज पडणार नाही. गोवा हे प्रगत राज्य आहे. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात इथे होत आहे. हा कायदा या देशातील सर्वात छोट्या राज्याला फार उपयुक्त ठरणार असल्याचे खासदार तानावडे म्हणाले. त्यांनी केंद्रातील वाणिज्यमंत्र्यांचेही आभार मानले. दोन महिन्यांपूर्वी ते गोव्यात आले होते. त्यांनी अनेक उद्योगपतींना मार्गदर्शन केले. अखेरीस काही समस्या असतील तर तानावडेंना सांगा असे म्हणाले होते. आपण आता राज्यसभेत पोहोचलो, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला.
मुख्यमंत्री, तानावडे आज भेटणार पंतप्रधानांना
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल बुधवारी येथून तातडीने दिल्लीला रवाना झाले. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत. दुपारी साडेबारा ते पंतप्रधानाना भेटणार आहेत. तानावडे हे त्यांच्यासमवेत पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहेत. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री गोव्यात परतणार आहेत.