सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष शैलेश पै यांचे गौरवोद्गार
ओटवणे प्रतिनिधी
सदाशिव विष्णु पेडणेकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रामाणिक संस्मरणीय सेवा बजावताना आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हृदयात स्थान मिळवले. तसेच शाळेच्या नावलौकिकात उत्कृष्ठ योगदान दिले. त्यांनी शाळेसाठी केलेले कार्य आणि कलात्मक अंगाने घडवलेले विद्यार्थी ही आमच्या शाळेची ठेव आहे. त्यांच्या सर्वांगीण कलेचा आणि अनुभवाचा शाळेला नेहमीच उपयोग होणार. अशा विद्यार्थी प्रिय श्री पेडणेकर सरांनी निवृत्त झालो म्हणुन न थांबता आपली कला विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे देत रहावी असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांनी केले.
सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक सदाशिव पेडणेकर हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शैलेश पै बोलत होते. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे खजिनदार मुकुंद वझे, सदस्य रविंद्र स्वार, श्रद्धा नाईक, राजश्री टिपणीस, प्राचार्य नारायण मानकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, संतोष वैज, दिगंबर पावसकर, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी सदाशिव पेडणेकर यांनी आपल्या प्रामाणिक सेवेतून या शाळेच्या यशस्वी वाटचालीला हातभार लावला असल्याचे सांगुन कोणतेही शैक्षणिक काम तत्परतेने करण्याच्या कार्यपद्धतीमुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात त्यांची खूप मदत झाली. शाळेच्या सरस्वती पूजन व सांस्कृतिक कार्यक्रमात सरांनी साकारलेली मखर सजावट, कार्यक्रमाला केलेले फलक लेखन, अप्रतिम कॅलिग्राफी याचा आवर्जून उल्लेख केला.
तसेच या संस्थेत आपल्या निर्मळ व मन मिळावू स्वभावातून त्यानी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अशा शब्दात त्यांच्या सेवेचा गौरव केला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी पेडणेकर सर यांनी वर्गातील फळ्यावर रेखाटलेले चित्र पुसताना सर्वांना वाईट वाटायचे अशा शब्दात त्यांच्या कलेचा गौरव करून त्यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या कायम स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था व शाळेच्यावतीने सदाशिव पेडणेकर यांचा व त्यांची पत्नी सौ पल्लवी, आई श्रीमती विजया यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच आजी-माजी विद्यार्थी आणि संस्था व मित्रपरिवार यांनीही त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांची मुलगी स्वराली पेडणेकर उपस्थित होती.
यावेळी सदाशिव पेडणेकर यांनी आपल्या या शैक्षणिक सेवेत संस्थेसह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे सांगून आजी माजी विद्यार्थ्यानीही आपला सन्मानच केला. आपल्या कुटुंबीयांचीही साथ लाभली. त्यामुळेच आपण चांगली सेवा करू शकलो असल्याचे सांगितले. तसेच शाळेशी यापुढेही आपले ऋणानुबंध कायम राहतील असे सांगितले असून सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्याक एन पी मानकर यानी सुत्रसंचालन, सोनाली बांदेलकर तर आभार ए. जे. ठाकर यानी मानले.