वृत्तसंस्था/ काठमांडू (नेपाळ)
19 वर्षाखालील पुरुषांच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद भारताच्या युवा संघाने पटकावले. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघातील बदली खेळाडू एम. किपगेन हा पुन्हा एकदा या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला. त्याची या स्पर्धेत सर्वात महत्त्वाचा फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली.
19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात आतार्पंत भारताने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या अंतिम सामन्यातील पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत भारतीय युवा संघातील खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची क्षमता आणि डावपेच यांची पारख करताना सावध खेळ केला. पण खेळाच्या उत्तरार्धात किपगेनने पाठोपाठ दोन गोल नोंदवत पाकच्या खेळाडूवर चांगलेच दडपण आणले. तसेच या स्पर्धेतील गोयेरीने नोंदवलेल्या तिसऱ्या गोलामध्येही किपगेनचा वाटा महत्त्वाचा होता. किपगेनने दिलेल्या पासवरच गोयेरीने भारताचा तिसरा आणि शेवटचा गोल नोंदवुन पाकचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. पाकच्या बचावफळीची कामगिरी सामन्याच्या पूर्वार्धात निश्चितच दर्जेदार झाल्याने भारताला आपले खाते उघडता आले नव्हते. भारताच्या आघाडीफळीतील खेळाडूंना पासेस देताना योग्य समन्वय साधता आला नाही. दरम्यान पाकने खेळाच्या पुर्वार्धात गोल करण्याच्या किमान दोन संधी वाया दवडल्या. 64 व्या मिनिटाला भारताचे खाते किपगेनने उघडले. पाकच्या बचावफळीला तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत त्याने अचूक गोल नोंदवला. 85 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल पुन्हा किपगेनने नोंदवला. सामना संपण्यास केवळ काही मिनिटे बाकी असताना किपगेनने दिलेल्या पासवर गोयेरीने भारताचा तिसरा आणि शेवटचा गोल नोंदवून स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या संघाला मिळवून दिले. सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटामध्ये पाक संघातील अली जाफरला पंचांनी दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने पाक संघाला दहा खेळाडूनिशी खेळावे लागले.