दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री
अल्लु अर्जुनच्या ‘पुष्पा ः द रुल’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. पुष्पाच्या सीक्वेलवरून चाहते अत्यंत उत्सुक आहेत. याचदरम्यान चित्रपटातील कलाकारांसंबंधी नवी माहिती समोर आली आहे. निर्माते या चित्रपटात आणखी एका दिग्गज कलाकाराला सामील करण्याची तयारी करत आहेत. सई पल्लवीची याकरता निवड होणार असल्याची चर्चा आहे.
चित्रपटात सई पल्लवी ही पुष्पराज ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अल्लु अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याचे मानले जात आहे. सईला दिग्दर्शक सुकुमार यांनी भूमिकेची ऑफर दिली आहे. सईने या भूमिकेला होकार दिल्यास चित्रपटाच्या कहाणीला नवे वळण मिळणार आहे. सई पल्लवीसाठी आदिवासी युवतीची एक भूमिका तयार करण्यात आली आहे. ही भूमिका सईच अत्यंत उत्तमप्रकारे साकारू शकते असे दिग्दर्शकाचे मानणे आहे.
पुष्पाच्या बहिणीची ही भूमिका फार मोठी नसणार आहे. निर्माते आता सईच्या होकाराची प्रतीक्षा करत आहेत. तर सईने नकार दिल्यास तिचा पर्याय म्हणून ऐश्वर्या राजेशच्या नावावर विचार केला जाणार आहे. मल्याळम चित्रपटांमधून कारकीर्द सुरू करणारी सई आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रामायणावर आधारित हिंदी चित्रपटात ती सीतामातेची भूमिका साकारू शकते.