किरण जॉर्जचा शि युकीवर सनसनाटी विजय, सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत, सिंधू, श्रीकांत पराभूत
वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल, युवा किरण जॉर्ज, लक्ष्य सेन यांनी शानदार विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने विजयी सलामी दिली. याशिवाय, अव्वल खेळाडू पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
बुधवारी पुरुष एकेरीतील सामन्यात भारताचा युवा खेळाडू किरण जॉर्जने विजयी प्रारंभ करताना चीनच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या शी युकीचा 21-18, 22-20 असा धक्कादायक पराभव केला. किरणने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी युकीला चुका करण्यास भाग पाडले. याच जोरावर त्याने विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता, त्याची पुढील लढत चीनच्या वेंग होंग यांगशी होईल. अन्य एका सामन्यात लक्ष्य सेनने चीनच्या वांग वेईचा 21-23, 21-15, 21-15 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे. आता, त्याचा पुढील सामना चीनच्या ले फेंगशी होईल.
पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात मात्र किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, बी साई प्रणिथ यांचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. मलेशियन मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या श्रीकांतला या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत चीनच्या वेंग यांगने 8-21, 21-16, 14-21 असे हरवले. याशिवाय, अन्य सामन्यात बी साई प्रणितला फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हने 14-21, 16-21 असे तर समीर वर्माला डेन्मार्कच्या मॅग्नसने 15-21, 15-21 असे नमवत बाहेरचा रस्ता दाखवला.
सायना नेहवालची विजयी सलामी, सिंधू पराभूत
या स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने विजयी प्रारंभ करताना कॅनडाच्या वेंग झांगचा 21-13, 21-7 असा पराभव केला. या विजयासह तिने दुसरी फेरी गाठली असून तिची पुढील लढत चीनच्या ही बिंगजाओविरुद्ध होणार आहे. अन्य एका लढतीत भारताच्या अश्मिताने मायदेशी सहकारी मालविका बनसोडला 21-17, 21-14 असा पराभवाचा धक्का दिला. तिचा पुढील सामना रिओ ऑलिम्पिक गोल्ड विजेती स्पेनची कॅरोलिना मारीनशी होईल.
महिला एकेरीतील अन्य एका सामन्यात मात्र भारताची दिग्गज खेळाडू पीव्ही सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कॅनडाच्या मिशेली लीने 62 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूचा 8-21, 21-18, 18-21 असा पराभव केला. सिंधूला या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत
राष्ट्रकुल विजेते व अव्वलमानांकित भारताच्या सात्विक-चिराग जोडीने विजयी सलामी देताना डेन्मार्कच्या रॅमस-फ्रेडरिक जोडीला 21-13, 18-21, 21-17 असे नमवले. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय जोडीला विजयासाठी संघर्ष करावा लागला खरा पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत सात्विक-चिरागने विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.