वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धासाठी घेण्यात येणाऱया निवड चाचणी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने घेतला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायना नेहवाल विद्यमान विजेती आहे.
बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तर चीनमधील हांगझोयु येथे आशियाई क्रीडास्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी निवड चाचणी स्पर्धा 15 ते 20 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीत घेतली जाणार आहे. 32 वर्षीय सायना नेहवालने दोनवेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक तर 2012 च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या आगामी निवड चाचणी स्पर्धेत आपण सहभागी होणार नसल्याचे सायनाने अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनला कळविले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 5 पुरूष आणि 5 महिला बॅडमिंटनपटूंची निवड केली जाईल तर आशियाई स्पर्धा, थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी 10 पुरूष आणि 10 महिला बॅडमिंटनपटूंचा भारतीय संघात समावेश राहील. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत वारंवार दुखापतीमुळे सायनाला सूर मिळू शकला नाही. सध्या ती महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत 23 व्या स्थानावर आहे. 2010 आणि 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवालने सुवर्णपदक मिळविले होते.