बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज संघाने स्वस्तिक संघाचा तर मझर युनायटेड संघाने शिवाजी कॉलनी संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज संघाने स्वस्तिक संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच स्वस्तिक व साईराज संघाने आक्रमक चढाया केल्या. 17 व्या मिनिटाला साईराजच्या यशोधनने गोल करण्याची नामी संधी दवडली. 23 व्या मिनिटाला स्वस्तिकच्या रेहानने मारलेला फटका गोलरक्षक अरविंदने उत्कृष्ट अडविला. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 47 व्या मिनिटाला तेजस इंचलच्या पासवर शशांक बोळगुंडीने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 52 व्या मिनिटाला स्वस्तिकच्या अजय मानेच्या पासवर ऑगस्टिन परेराने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर साईराजने आक्रमक चढाया सुरू केल्या. 60 व्या मिनिटाला सौरभ धामणेकरच्या सुरेख पासवर तेजस इंचलकरने दुसरा गोल करून 2-1 ची आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना स्वस्तिकच्या ऑगस्टिन परेराने मिळालेली संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.
दुसऱ्या सामन्यात मझर युनायटेड संघाने शिवाजी कॉलनी संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला मझर युनायटेडच्या उमरने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 16 व्या मिनिटाला शिवाजी कॉलनीच्या कृष्णा मुचंडीने वेगवान फटका गोलमुखात मारला. पण गोलरक्षक साकिर बेपारीने उत्कृष्टपणे अडवला. 22 व्या मिनिटाला अबुझर बिस्तीने गोल करण्याची नामी संधी दवडली. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला मध्यरेषेजवळ फ्री किक मिळाली. झियाउद्दीनचा सुरेख फटका गोलपोस्टकडे मारला. यावेळी गोलरक्षक अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला चेंडू लागून बाहेर गेला. त्याचा फायदा घेत अबुझर बिस्तीने सरळ चेंडू गोलमुखात मारून 1-0 ची आघाडी मझर युनायटेडला करून दिली. 36 व्या मिनिटाला शिवाजी कॉलनीच्या दर्शन गणेशकरने मारलेला वेगवान फटका गोलरक्षक साकिरने उत्कृष्ट अडविला. 52 व्या मिनिटाला मझर युनायडेच्या उमरने गोल करण्याची संधी दवडली. 58 व्या मिनिटाला लेफ्टआऊटर मुस्ताकच्या पासवर अबुझर बिस्तीने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 62 व्या मिनिटाला रेहान किल्लेदारने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने गोल करण्यात वंचित राहिला. शेवटी हा सामना मझर इलेव्हनने 2-0 असा जिंकून 2 गुण मिळविले. मान्यवरांच्या हस्ते या सामन्यातील सामनावीर साकिर बिस्तीला तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरांगला चषक देऊन गौरविण्यात आले. तर पहिल्या सामन्यातील सामनावीर सौरव धामणेकर तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून विशाल गौडाला चषक देऊन गौरविण्यात आले.