दरदिनी 20 हजार रुपये मिळणार
कोरोनानंतर जगभरात नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. अनेक कंपन्या बंद झाल्या तर कित्येक ठिकाणी कर्मचारी कपात करण्यात आली होती. परंतु याचदरम्यान काही अनोख्या कल्पनांद्वारे लोक घरबसल्या कोट्याधीश झाले. आता एका अशा जॉबची जाहिरात समोर आली आहे, जिचे वेतन जाणून घेतल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. ब्रिटनच्या व्हिटबै हार्बरवर असलेल्या मिस्टर चिप्स चिप्पी कंपनीने एक अजब जॉब पोस्ट काढली आहे. या जॉबमध्ये संबंधिताला केवळ पक्ष्यांना पळवून लावण्याचे काम करावे लागेल. कंपनीच्या परिसरातील पक्ष्यांना पिटाळून लावण्यासाठी ही कंपनी भरभक्कम पगार देईल. या जॉबकरता कंपनी प्रतिदिन 20 हजार रुपये देण्यास तयार आहे. जर संबंधित व्यक्तीने पक्ष्यांना योग्यप्रकारे पळवून लावण्यास यश मिळविल्यास त्याला लाखोचा पगार महिन्याकाठी मिळणार आहे. या कंपनीच्या परिसरात माशांचा साठा केला जातो. ही कंपनी फिश चिप्स तयार करते. माशांचा साठा करण्यादरम्यान सिगल पक्षी कर्मचाऱ्यांवर हल्ले करून मासे चोरतात. यामुळे कंपनीचे बॉस एलेक्स बोयड यांनी या जॉब पोस्टबद्दल निर्णय घेतला. सीगलपासून माशांना वाचविणाऱ्या व्यक्तीला दिवसाकाठी 20 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेनंतर अनेक जणांना अर्ज केले, परंतु कुणालाच पक्ष्यांना पळवून लावता आलेले नाही.