मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचनेमुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभागावर अन्याय करण्यात आला. याविरोधात उतरलेल्या नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेक सीमावासीय गतप्राण झाले. हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवार दि. 17 रोजी सकाळी 9.30 वा. हुतात्मा चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
बेळगावसह 865 गावे कर्नाटकात डांबण्यात आली. याविरुद्ध मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये अनेकांची प्राणज्योत मालवली, तर काहीजणांनी कारागृहात जीव सोडला. 17 जानेवारी 1956 मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान हुतात्मा मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे यांसह सीमावासियांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
सीमावासियांना हुतात्मादिनी होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी, तालुका महिला आघाडी, शिवसेना यांच्यामार्फत केले आहे. बेळगाव शहरामध्ये हुतात्मा चौकात श्रद्धांजली वाहिली जाते. त्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड या मार्गावर फेरी काढून श्रद्धांजली वाहिली जाते. याचबरोबर कंग्राळी व खानापूर येथेही श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
निपाणीत आज हुतात्मा दिन
भाषावार प्रांतरचनेनुसार निपाणीसह सर्व सीमाभाग कर्नाटकात डांबला गेला. त्याला 66 वर्षे झाली. या लढ्यात निपाणी भागातील कमळाबाई मोहिते व बारवाडचे गोपाळ चौगुले यांना हौतात्म्य आले. सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी निपाणीत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
दरवषी निपाणीत 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन तर 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. यादिवशी बहुतांशी व्यावसायिक आपापले व्यवहार बंद ठेवून सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्र्रद्धांजली वाहतात. त्यानुसार मंगळवारी सकाळी 10.30 वाजता बेळगाव नाका येथे माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांना व त्यानंतर 11 वाजता साखरवाडी येथे हुतात्मा कमळाबाई मोहिते यांना अभिवादन केले जाणार आहे. तरी याप्रसंगी उपस्थित रहावे, तसेच यादिवशी आपापले व्यवहार बंद ठेवून हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे आवाहन म. ए. समितीचे जयराम मिरजकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी केले आहे.