सत्तरी तालुक्मयातील जंगलात रानकुत्र्यांची वाढती संख्या : रानटी जनावरांच्या मुळावर
वाळपई : सत्तरी तालुक्मयातील जंगलामध्ये रानकुत्र्यांची (देवकोल्हे) संख्या वाढत आहे. यामुळे रानटी जनावरांवर हल्ल्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे आगामी काळात रानकुत्र्यांची वाढती संख्या रानटी जनावरांच्या सुरक्षेच्या मुळावर आलेली आहे. चार दिवसांपूर्वी उस्ते या ठिकाणी एका सांबरावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रकार घडला आहे. उस्ते येथील जंगलात रान कुत्र्याच्या हल्ल्यात सांबर गंभीररीत्या जखमी केले होते. या संदर्भाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी व वाळपई वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब धाव घेऊन जखमी सांबराला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तो मृत्यू झाला.
दरम्यान, सदर सांबराच्या मागे सुमारे वीस रानकुत्र्यांनी हल्ला करून त्याचा सर्व बाजूने चावा घेत जबर जखमी केले होते. रानकुत्रा जंगली प्राणी आहे. तो गटात फिरत असतो. एकदा कुठल्याही रानटी जनावरावर त्यांनी हल्ला केला तर त्याला ठार मारल्याशिवाय कधी सोडत नाही. चोहो बाजूने त्याचा चावा घेत त्याचे लचके तोडतात. त्यात त्या प्राण्याचा मृत्यू होत असतो. सांबराला ठार करण्याचा हा प्रकार चार दिवसापूर्वी घडला. स्थानिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार उस्ते भागामध्ये रान कुत्र्यांची संख्या वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रानकुत्र्यांच्या एका सांबराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे दुसरे प्रकरण घडले आहे. उस्ते या ठिकाणी सदर सांबर जखमी अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकाकडून उपलब्ध झाली होती. त्यानंतर ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर शिंगाड्याला वाळपई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यानी दिली.