दोन्ही महिला सत्तरी तालुक्यातील : मालिनीची सबसिडी, रेशनकार्ड रद्द.यंत्रणेच्या दोषाची शिक्षा भोगतेय मालिनी
फोंडा : भारतीय नागरिकांची ओळख असलेले आधार कार्ड हे ‘युनिक’ मानले जाते. त्यावरील बारा आकडी आधार क्रमांक हा एका व्यक्तीपेक्षा अधिक लोकांना मिळूच शकत नाही. असे असले तरी दोघा व्यक्तींना समान आधार क्रमांक मिळाल्याने आधारच्या ‘युनिक’तेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ली बँक खात्यापासून प्रत्येक सरकारी योजनेसाठी आधार कार्ड सक्तीचे केल्याने त्याबाबत नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. समान आधार क्रमांक असलेल्या दोन्ही व्यक्ती सत्तरी तालुक्यातील वयस्क महिला आहेत. दाबोस सत्तरी येथील लक्ष्मी नारायण धुरी व सोनाळ सत्तरी येथील मालिनी विष्णू गांवकर या दोन्ही महिलांचा आधार क्रमांक समान आहे.
मालिनीचे पैसे लक्ष्मीच्या खात्यात
समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. पंतप्रधान किसान योजनेतंर्गत मालिनी यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी चौकशी केली असता, हा चक्रावून टाकणारा प्रकार उघडकीस आला. दयानंद निराधार योजनेच्या लाभधारक असलेल्या मालिनी यांचे पैसे असेच लक्ष्मी यांच्या खात्यात जमा होत आहेत. मात्र लक्ष्मी या सामंजस्याने मालिनी यांची रक्कम तिला सुपूर्द करीत आहे.
मालिनीची सबसिडी बंद, रेशनकार्डही रद्द
आधार क्रमांकाच्या या गोंधळामुळे मालिनी गांवकर यांची गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद झाली असून आता तिचे रेशनकार्डही रद्द झाल्याने ती अडचणीत सापडली आहे.
मालिनीला मुंबईला जाण्याचा ‘अजब गोड’ सल्ला
आधार क्रमांकाचा हा गोंधळ लक्षात आल्यानंतर मालिनी यांनी त्यात दुऊस्ती करण्यासाठी बराच खटाटोप केला. सुऊवातीला वाळपई आरोग्य केंद्रातील आधार केंद्रावर जाऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर पर्वरी येथील मुख्य केंद्रातही त्यांनी हेलपाटे मारले. पण तिला टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा किंवा तेथून प्रतिसाद मिळत नसल्यास मुंबईत जाऊन दुऊस्ती करण्याचा सल्ला आधार केंद्रावऊन देण्यात आला.
यंत्रणेच्या दोषाची शिक्षा मालिनीने का भोगावी
मुंबईत जाऊन ही दुरुस्ती करणे तिला शक्य नाही. आधीच आधारकार्डवरील छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी नागरिकांना टपाल खाते व बँकांमधील आधार केंद्रांवर रांगेत थांबणे मोठी डोकेदुखी बनली आहे. शिवाय प्रत्येक दुरुस्तीसाठी वेगळे पैसे मोजावे लागत आहेत. अशा प्रकारची दुरुस्ती गोव्यात होत नसल्यास मालिनीसारख्या ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक महिलेला ही अनाठाई शिक्षाच म्हणावी लागेल. शिवाय आधार कार्ड बनविणाऱ्या यंत्राणांच्या तांत्रिक दोषाची शिक्षा तिने का भोगावी? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मालिनीचा सामंजस्यपणा अन् अस्वस्थता
बँक खात्यातील मालिनी गांवकरची रक्कम आपल्या खात्यात जमा होत असल्याचे लक्षात येताच लक्ष्मी धुरी यांनी सामंजस्याने वेळोवेळी तिचे पैसे तिला दिलेले आहेत. मात्र आता रेशनकार्डच रद्द झाल्याने येणाऱ्या काळात आधार क्रमांकाच्या घोळामुळे अजून किती समस्यांना तोंड द्यावे लागेल या कल्पनेनेच तिला अस्वस्थ करून टाकले आहे. दोन व्यक्तींना एकच आधार क्रमांक हा गोव्यातील एकमेव अपवाद नसावा. अजून काही आधारकार्डे तपासल्यास समान क्रमांक मिळू शकतील. त्यामुळे आधार बाबत प्रत्येक नागरिकाला आता सतर्क राहावे लागणार आहे.