वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्मा, किरण जॉर्ज आणि अस्मिता चलिहा यांनी एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. पात्र फेरीच्या लढतीत भारताच्या या बॅडमिंनटपटूंनी प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या पात्र फेरीच्या सामन्यात भारताच्या समीर वर्माने मलेशियाच्या झोईचा 21-12, 21-17 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. समीर वर्माने अलीकडेच स्लोव्हेनिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. पात्र फेरीमध्ये समीर वर्माला इंडोनेशियाच्या अदिंता आणि स्पेनच्या पेनालव्हेर यांच्याकडून पुढे चाल मिळाली होती. 2018 च्या बॅडमिंटन हंगामात 26 वर्षीय समीर वर्माने तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. आता थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत समीर वर्माचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या जोहानसेनशी होणार आहे. पुरुषांच्या अन्य एका पात्र फेरीच्या सामन्यात किरण जॉर्जने भारताच्याच कार्तिकेय गुलशनकुमारचा 21-10, 21-14 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. बुधवारी किरण जॉर्जचा पहिल्या फेरीतील सामना चीनच्या युक्वीशी होणार आहे.
महिला एकेरीच्या पात्र फेरीतील सामन्यात भारताच्या अस्मिता चलियाने आपल्याच देशाच्या उन्नती हुडाचा 21-16, 13-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर पुढील फेरीतील सामन्यात अस्मिताने इस्टोनियाच्या कुबाचा 21-19, 21-11 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमधील खेळाडूंच्या सामन्यांना बुधवारपासून प्रारंभ होत आहे. भारताच्या बी. साईप्रणित आणि राष्ट्रीय चॅम्पियन मिथून मंजुनाथ यांना प्रमुख ड्रॉमध्ये स्थान देण्यात आले आहे.