जिल्ह्यात चंदन चोरट्यांचा उच्छाद : मुसक्या आवळण्याची मागणी : शेतकऱ्यांना आर्थिक फटका
बेळगाव : बागायत खात्याच्या अनुदानाचा वापर करून जिल्ह्यात चंदन लागवड वाढू लागली आहे. तर दुसरीकडे चंदन शेतीला तस्करीची वाळवी लागली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी चंदन चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही चंदन उत्पादकांतून होत आहे. जिल्ह्यात 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 145 हेक्टरात चंदनाची लागवड झाली आहे. त्यामुळे चंदनाचा विस्तार वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे चंदनाची झाडे कापून चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. बाजारात प्रतिकिलो 6 ते 8 हजार रुपये चंदनाचा दर आहे. त्यामुळे चंदनाच्या चोऱ्या वाढू लागल्या आहेत. लाकूड कापण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. रात्रीच्या अंधारात चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. एका बेळगाव तालुक्यात आठवड्याभरात 50 हून अधिक ठिकाणी चंदनाची झाडे कापण्यात आली आहेत. त्यामुळे चंदनाच्या झाडांचा संरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. बेळगाव, खानापूर आणि इतर ठिकाणी चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. अलीकडे चंदनांची रोपटी लावून काहींनी संवर्धन केले आहे. मात्र चोरट्यांकडून एका रात्रीत झाडे चोरली जात आहेत. याबाबत पोलीस आणि वनखाते उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चंदनाच्या चोरीचा उपद्रव वाढला आहे. प्रशासन चोरट्यांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्न चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
चोरट्यांच्या उपद्रवामुळे अडचणी
एक-दोन एकरात चंदनची लागवड केली आहे. मात्र चोरट्यांकडून पैसे कमविण्याच्या नादात चोरी होऊ लागली आहे. झाडांचे बुंदे, फांद्या तोडल्या जात आहेत. लागवडीसाठी कष्ट आणि पैसे खर्च केले आहेत. मात्र चोरट्यांच्या उपद्रवामुळे अडचणी वाढल्या आहेत.
-सुरेश पाटील-शेतकरी
अधिक दर असल्याने चोरट्यांकडून चंदन लक्ष्य
मागील दोन वर्षांत 145 हेक्टरात चंदनाची लागवड झाली आहे. 10 ते 15 वर्षांनंतर उत्पन्न मिळत असले तरी चंदन लागवड वाढू लागली आहे. मात्र बाजारात अधिक दर असल्याने चोरट्यांकडून चंदन लक्ष्य केले जात आहे. पोलीस आणि वन खात्याने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
– महांतेश मुरगोड-सहसंचालक बागायत खाते