विटा प्रतिनिधी
विद्युत मोटर, दुचाकी, शेळ्या चोरणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह सहा लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ओंकार हणमंत बोडरे ( २०, ताकारी, ता. वाळवा) आणि विशाल उर्फ आकाश भिमाशंकर जाधव (२४, सोन्याळ, ता. जत) अशी संशयितांची नांवे आहेत. तर अन्य सहकारी संशयित आकाश दीपक घाडगे (रा. तुपारी, ता. वाळवा) पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत पोलिस निरीक्षक डोके यांनी दिलेली माहिती अशी, विट्यातील सुर्यनगर येथील प्रकाश बंडू सुर्यवंशी यांनी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेळ्या चोरी झाल्याची फिर्याद विटा पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता. शुक्रवार चार ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विटा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संशयित दोन तरूण विनानंबर प्लेटच्या दुचाकीवरून विटा-आळसंद रस्त्यावरून फिरत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलिसांना मिळाली होती. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असणारी दुचाकी आटपाडी येथून चोरल्याची, ७६ हजार रूपये किंमतीच्या दहा शेळ्या, ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी, २० हजार रूपयांची विद्युत मोटर, रोख सात हजार रूपये आणि पाच लाख रूपयांची चारचाकी असा एकूण सहा लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उत्तम माळी, अमोल कराळे, हेंमत तांबेवाघ, सुनील पाटील, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, कॅप्टनसाहेब गुंडवाडे, अजय पाटील यांच्या पथकाने केली.