अन्य एका संशयातीला दहा दिवसांची पोलिस कोठडी
मिरज / प्रतिनिधी
म्हैसाळमधील सामुहीक हत्याकांड प्रकरणातील संशयीत मांत्रिक अब्बास मोहंमदअली बागवान (वय 48, रा. मुस्लिम बाशा पेठ, मुलगांव रोड, सरवदेनगर, सोलापूर) याला छातीत दुखू लागल्याने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आणखी एक संशयीत धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 30, रा. वसंतविहार, ध्यानेश्वरी नगर, पुणा नाका, सोलापूर) याला न्यायालयाने दहा दिवस म्हणजेच सात जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बागवान याच्यावर उपचार होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक केली जाणार आहे.
म्हैसाळ येथे डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे या दोघा भावांना गुप्तधनाचे अमिष दाखवून त्यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांची हत्या केल्याच्या संशयावरुन अब्बास बागवान आणि धीरज सुरवशे या दोघा मांत्रिकांना सोमवारी सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. सदर दोघा संशयीतांना अधिक चौकशीसाठी मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी सदर दोघा संशयीतांना न्यायालयासमोर उभे केले असता अब्बास बागवान याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे उपचारासाठी त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक संशयीत धीरज सुरवशे याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आता अब्बास बागवान याच्यावर उपचार होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करुन पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सदर दोघा संशयीतांकडून अधिक चौकशी केल्यानंतर म्हैसाळ हत्याकांड प्रकरणातील आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.